Sun, Dec 08, 2019 22:00होमपेज › Belgaon › तलवारीने केक कापणे पडले महागात 

तलवारीने केक कापणे पडले महागात 

Published On: Jul 24 2019 1:39AM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
बेळगाव : प्रतिनिधी

सांबरा रोड मारुतीनगर येथील 9 तरूणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु, याचे खरे कारण पोलिसांना विचारले असता वाढ दिवसाचा केक तलवारीने कापल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये राहुल इराप्पा बागेवाडी (वय 32), सागर बसवराज मारिहाळ (वय 29, दोघेही रा. माळी गल्‍ली, बेळगाव), नागेंद्र शंकर पाटील (वय 30), सर्वेश अभिजित कंग्राळकर (20), परशुराम राजू रायबाग (19), संतोष शांताबार मिरजकर (27), मंजुनाथ रवी बडीगेर (19), गणेश मल्‍लिकार्जुन गस्ती (20), मयूर महादेव अनगोळकर (30, सर्वजण रा. तिसरा क्रॉस, मारुतीनगर, सांबरा रोड, बेळगाव) यांचा समावेश आहे. 

व्हिडिओमुळे गुन्हा 

काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेल्या तरुणापैकी एकाचा  वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी सर्व तरुण एकत्रित जमले होते. त्यांनी वाढदिवसाचा केक कापला खरा परंतु, त्यासाठी त्यांनी चक्क तलवारीचा वापर केला. या तरुणांनी केक कापतानाचा व्हिडिओ देखील केला आणि तो सध्या मोबाईलवर व्हायरल होत आहे. याची दखल घेऊन माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या 9 तरुणांविरोधात सीआरपीसी कलम 110 (ई) व (जी) अंतर्गत कारवाई म्हणून गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तत्पूर्वी त्यांची जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

अनुभवातून हवे शहाणपण

काही महिन्यांपूर्वी गांधीनगर परिसरातीलही तरुणांनी एकाचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापून तो व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यावेळी तो व्हिडिओ सर्वत्र फिरल्यानंतर माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्धीस दिले होते. तेव्हा पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता. आता अशाच प्रकारचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. माध्यमांमध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे तरी वाढदिवस साजरा करताना कोणते निर्बंध पाळायला हवेत, याबाबतची दक्षता घेण्याची गरज आहे.