Tue, Dec 10, 2019 13:56होमपेज › Belgaon › बाऊन्सरचा खून : तिघांना अटक

बाऊन्सरचा खून : तिघांना अटक

Published On: May 18 2019 1:43AM | Last Updated: May 17 2019 11:20PM
बार्शी ः तालुका प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरून हॉटेल बाऊन्सरचा खून आणि एकावर खुनी हल्ला  केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी तिघांना कुर्डूवाडी येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्यांना शुक्रवारी बार्शी न्यायालयात उभे केले असता 24 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

 बापू हणुमंत शेंडगे (वय 20, रा. खांडवी, ता. बार्शी) असे खून झालेल्याचे व योगेश भारत भाकरे (वय 25) असे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. प्रदीप ऊर्फ भैया बोराडे, सुनील ऊर्फ तात्या राऊत, विशाल ऊर्फ बिट्टू जाधव (सर्वजण रा.  बार्शी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी शहराजवळील बळेवाडी परिसरात सँट्रो नावाचा ऑर्केस्ट्रा बार असून तेथे बापू शेंडगे  हा सुरक्षारक्षकाचे (बाऊन्सरचे) व योगेश भाकरे हा व्यवस्थापनाचे काम करीत होता. मंगळवारी (दि. 14 मे) हे दोघे तरुण दुचाकीवरून बार्शीत कामानिमित्त आले होते. दरम्यान, त्यांची दुचाकी शहरातील     बाळेश्‍वर नाका परिसरात  आल्यावर त्यांच्या दुचाकीमधील पेट्रोल संपल्यामुळे त्यांची गाडी झटके देत चालत  होती. त्यावेळी पाठीमागून  दुचाकीवरून येणार्‍या तिघा तरुणांनी शिवीगाळ केली व गाडी नीट चालव, असे म्हटले होते. तेव्हा शेंडगे व भाकरे यांनी त्यांची दुचाकी बाळेश्‍वर नाक्यावर सावलीत उभी केली व ते दोघे पेट्रोल आणण्यासाठी गेले. ते दोघे पेट्रोल घेऊन नाक्यावरील दुचाकीजवळ आले असता तेथे अगोदरच उभे असलेल्या तिघा आरोपींनी या दोघांवर गुप्ती व लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात  शेंडगे याचा जागेवरच मृत्यू झाला होता तर भाकरे यास रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याप्रकरणी बार्शी शहरातील तीन तरुणांवर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. खून प्रकरणातील आरोपी कुर्डूवाडी येथे एका लॉजमध्ये लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, हवालदार चंद्रकांत  आदलिंगे, सचिन आटपाडकर आदींनी तिघांना ताब्यात घेतले.  उपविभागीय पोलिस अधिकारी संजय नाईक-पाटील अधिक तपास करत आहेत.