Mon, Dec 09, 2019 10:58होमपेज › Belgaon › ‘गावमाती’चा गंध जोपासणारा साहित्य सोहळा

‘गावमाती’चा गंध जोपासणारा साहित्य सोहळा

Published On: Nov 22 2018 1:13AM | Last Updated: Nov 21 2018 8:52PMबेळगाव : शिवाजी शिंदे

गावाला लाभलेला समृद्ध वारसा वृद्धिंगत करण्यासाठी बेळगुंदी येथे 2006 पासून साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. दिग्गज साहित्यिक, रसिकांचा प्रतिसाद, ग्रामस्थांचा सहभाग यातून संमेलनाची उंची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रसिकमनाला भुरळ घालणारे संमेलन म्हणून याची गणना करण्यात येते. बेळगाव तालुक्यातील पश्‍चिम भाग हा मराठमोळा आहे. या भागात मराठीचे वर्चस्व आहे. मराठी भाषिक अधिक संख्येने आहे. परिणामी या भागात चार साहित्य संमेलने पडतात. यामध्ये बेळगुंदी संमेलन अग्रस्थानी आहे. 

बेळगुंदी गावाला साहित्यिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. देशपातळीवर नावलौकिक मिळविलेले हिंदी आणि मराठी साहित्यिक काका कालेलकर यांनी याठिकाणी काही वर्षे आसरा घेतला होता. त्यांच्या वास्तव्याने या गावच्या लाल मातीला साहित्याचा सुगंध लाभला. स्वातंत्र्यसैनिक घाटे गुरुजीदेखील बेळगुंदीचेच. इंदुमती तेंडुलकर यादेखील बेळगुंदी येथीलच. यामुळे या गावावर सर्वोदयी विचारांचा पगडा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईबरोबरच सीमालढ्यातदेखील गावातील युवकांनी रक्त सांडले आहे. कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात 1986 साली येथील युवकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. परिणामी या मातीला त्याग, संस्कार, साहित्य, शिक्षण यांचा वारसा लाभला आहे. परिसरात साहित्यिक चळवळ जोमाने सुरू करण्यासाठी 2006 मध्ये संमेलन सुरू केले. यासाठी रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली. प्रा. अजित सगरे यांनी पुढाकार घेतला. गावकर्‍यांच्या सहकार्याने संमेलन आयोजित करण्यात येऊ लागले. पहिल्याच संमेलनांला प्रा. वैजनाथ महाजन यांनी मांडलेल्या विचारामुळे संमेलनाला अधिष्ठान लाभले. येथून पुढे संमेलन अधिकाधिक दर्जेदार होत गेले.

संमेलनामध्ये आजवर प्रा. सोमनाथ कोमरपंत, प्रा. मिलिंद जोशी, जयंत टिळक, प्रा. सुनीलकुमार लवटे, नाटककार अभिराम भडकमकर यासारखे दिग्गज साहित्यिक सहभागी झाले आहेत. यावर्षी 9 डिसेंबर रोजी संमेलन होणार असून ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोतापल्ले संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाची नोंदणी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे केली आहे. वाचनालय चालविण्यात येते. याचा लाभ ग्रामस्थांना होत आहे. वाचन चळवळ वाढीला लागत आहे.