Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › बेळगावच्या चोरट्यांनी वळविला कोल्हापूरकडे मोर्चा

बेळगावच्या चोरट्यांनी वळविला कोल्हापूरकडे मोर्चा

Published On: Mar 04 2019 1:05AM | Last Updated: Mar 03 2019 10:17PM
बेळगाव : संदीप तारिहाळकर 

बेळगाव शहर परिसरातील काही दरोडेखोरांसह चोरट्यांनी आपला मोर्चा कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात वळविला आहे. मंगळवारी गडमुडशिंगी(ता. करवीर) व कागल येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोड्याच्या तयारीत असताना बेळगावच्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळ्यांकडून अत्याधुनिक यंत्रसामग्री व शस्त्रांचा वापर करुन दहशत माजविण्याचा प्रकार सुरु आहे.

दि. 14 फेबु्रवारी रोजी कल्‍लेहोळ (ता. बेळगाव) येथील परशराम नाना गौंडाडकर याने चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात भरदिवसा 16 घरफोड्या करुन अर्धा किलो सोने, दीड किलो चांदी लंपास केली होती. या घटनेनंतर अवघ्या दहा दिवसांत बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना बेळगावच्या तीन तरुणांसह अन्य एकाला कोल्हापुरात अटक करण्यात आली. यामध्ये जिपान शाबुद्दीन अन्‍नीवाले (रा. उज्ज्वलनगर, बेळगाव), मंजुनाथ बसवराज पाटील (वीरभद्रनगर, बेळगाव), रफिक खतालसाब पठाण (बेळगाव) यांच्यासह त्यांचा साथीदार यासीन उस्मान धारवाडकर (शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) यांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या टोळीतील एकजण पसार झाला. या चौघांकडून कागल येथील बँक व गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेवरील दरोड्याबाबात अगोदर रेकी करण्यात आली. योग्य दिवस निवडून ही टोळी दि. 25 रोजी कागलजवळ उड्डाणपुलावर दरोड्याच्या तयारीत होते. याची खबर मिळताच पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या.यापूर्वी झालेल्या चोर्‍या, दरोडे यामध्ये या टोळीच सहभाग आहे का, याचा तपास सुरु आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे? तसेच कोल्हापुरातील अन्य प्रकरणात यांचा सहभाग आहे का? यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून बेळगाव येथे येऊन माहिती घेण्यात येत आहे. या टोळीकडून ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती गॅस सिलिंडर, गॅसगन, लोखंडी कटावण्या, कटर, लायटर आदी साहित्याचा वापर करण्यात येत आहे.

हुक्केरी येथील काडय्या टोळीने कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. तत्कालीन पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोका कायद्यान्वये कारवाई करुन या टोळीला तुरुंगात पाठविले आहे. मात्र सध्या चोरट्यांचा वावर पाहता अन्य टोळ्या  ‘मोका’लाही धजेनाशा झाल्या आहेत.

आधी चेनस्नॅचिंग, आता दरोडे

दोन वर्षापूर्वी चंदगड तालुक्यात महिपाळगड, शिनोळी, होसूर, कोवाड, सुंडी या मार्गावर भरदिवसा वाटसरु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या लांबविल्या आहेत. यामध्ये बेळगावचे चेनस्नॅचर सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते. आता चोरट्यांनी घरफोड्या, सराफांची दुकाने व बँका लुटण्याकडे मोर्चा वळविला आहे.

क्राईम बॉर्डर मीटिंग यावी फळाला

बेळगाव, कोल्हापूर, गोवा पोलिसांची केवळ निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर क्राईम बॉर्डर मिटिंग घेतली जाते. मात्र, सीमाभागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठरावीक कालावधीने सातत्याने अशा बैठकीची गरज आहे.