Tue, Dec 10, 2019 13:43होमपेज › Belgaon › बेळगाव, खानापुरात समिती विरूद्ध राष्ट्रीय पक्ष : उर्वरित 15 मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजप

लढती तिरंगी, ‘मराठी’साठी दुरंगी

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 8:12PMमराठी आवाज विधानसभेत पोचवण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी विधानसभा निवडणूक आज, शनिवारी होत आहे. जिल्ह्यात 18 मतदारसंघ असले तरी मराठीचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी लढा होत आहे तो बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या तीनच मतदारसंघांत. त्यामुळे या मतदारसंघांत मराठी विरुद्ध राष्ट्रीय पक्ष अशा थेट लढती होत आहेत. उर्वरित 15 मतदारसंघांमध्येही थेट लढतीच होत असल्या तरी त्या काँग्रेस विरुद्ध भाजप अशा आहेत. निजद हा रिंगणातील तिसरा पक्ष असला तरी काँग्रेस आणि भाजपपुढे निजदचे आव्हान नगण्य मानले जाते. तरीही निजद अस्तित्व दाखविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

म. ए. समितीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. मराठी भाषिक मतदारांच्या जोरावर समितीकडून तिन्ही जागांवर विजय मिळविण्याचा दावा करण्यात येत आहे. तर उर्वरित 15 मतदारसंघात काँग्रेस, भाजप, निजदने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना आणून पंधरा दिवस प्रचाराचे रान उठविलेे. मतदार कोणत्या पक्षाला साथ देणार हे 15 मे रोजी स्पष्ट होईल.

बेळगाव दक्षिण
मराठी भाषिकांचे वर्चस्व असणार्‍या या मतदारसंघात म. ए. समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे, भाजपचे अभय पाटील, काँगे्रसचे एम. डी. लक्ष्मीनारायण यांच्यामध्ये लढत होणार आहे. मरगाळे यांनी मतदारसंघ ढवळून काढला आहे. मध्यवर्ती म. ए. समिती व मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेल्या कामामुळे त्यांना मतदारातून चांगल्या प्रकारे प्र्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माजी आ. अभय पाटील यांनीही ताकद पणाला लावली आहे. आमदार असताना पाच वर्षांत केलेल्या समाजकार्याच्या जोरावर विजय संपादन करण्याचा त्यांना विश्‍वास आहे. 
ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेळगावात दाखल होऊन काँग्रेसची उमेदवारी मिळविणारे विधान परिषद सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण यांची मदार काँग्रेसची परंपरागत मते व विणकर समाजाच्या पाठिंब्यावर आहे. या तिघांमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. 

बेळगाव उत्तर

निवडणुकीत निकोप स्पर्धा मागे पडून धार्मिक मुद्यांवर हा मतदारसंघ ढवळून निघाला आहे. काँग्रेसविरुद्ध भाजप असा सरळ सामना रंगणार आहे. धर्म, जातीच्या मुद्यांवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न प्रथमच झाला आहे.

काँग्रेसने आ. फिरोज सेठ यांना सलग तिसर्‍यांदा संधी दिली आहे. मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते आणि विकासकामांमुळे त्यांनी विजयी होण्याचा दावा केला आहे.  त्यांच्या विरोधात भाजपकडून अ‍ॅड. अनिल बेनके लढत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते भाजपमधून कार्यरत असून त्यांना मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यांनी सेठ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.बाळासाहेब काकतकर हेदेखील रिंगणात असून ते मराठी मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना काही भागात प्रचार करण्यास मराठी भाषिकांनी मज्जाव केला.

चिकोडी-सदलगा 

मतदारसंघात थेट काँग्रेस-भाजपचे उमेदव अशी लढत होत आहे. आ. गणेश हुक्केरी यांच्याविरोधात भाजपतर्फे सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी दंड थोपटले आहेत. खा. प्रकाश हुक्केरी यांचा हा परंपरागत मतदारसंघ असून याठिकाणी त्यांचे वर्चस्व आहे. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र गणेश हुक्केरी हे निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना धूळ चारली होती. त्यानंतर यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांनी याठिकाणी निवडणुकीत सहभाग घेतला आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांचा या भागात दबदबा आहे. त्याचबरोबर भाजप मतांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अथणी 

राज्याच्या राजकारणातील बडी असामी म्हणून ओळख निर्माण झालेल्या आ. लक्ष्मण सवदी यांना घेरण्यासाठी काँग्रेसने महेश कुमटळ्ळी यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाला असून याठिकाणी निजद उमेदवारामुळे तिरंगी लढत होणार  आहे.

लक्ष्मण सवदी भाजपच्या सत्ताकाळात मंत्री होते. त्याकाळात त्यांनी विकासकामे केली. मात्र जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्‍या मतदारसंघात अनेक समस्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. काँग्रेसकडून तोच प्रचाराचा मुद्दा बनविण्यात आला आहे.  त्याचबरोबर विधीमंडळात ‘ब्लू फिल्म’ पाहण्याचा आरोप सवदी यांच्यावर आहे. याचा काही प्रमाणात त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. निजदतर्फे गिरीश बुटाळेे टक्कर देत आहेत.

निपाणी

राज्यातील क्रमांक एकचा मतदारसंघ म्हणून निपाणीची ओळख आहे. बहुतांशी मराठी आणि काही प्रमाणात कन्नड भाषिकांचा भरणा असणारा हा मतदारसंघ काँग्रेस भाजपकडून हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे.माजी आ. काकासाहेब पाटील यांनी भाजपला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशिलकुमार शिंदे यांच्यापासून महाराष्ट्र व कर्नाटकातील बड्या नेत्यांनी हजेरी लावून प्रचाराचा धुरळा उडविला. त्यामुळे जोल्ले यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले  आहे. 

मागील निवडणुकीत शशिकला जोल्ले यांना साथ देणार्‍या प्रा. सुभाष जोशी यांनी काकासाहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विजयाचा लंबक कोणाकडे झुकणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांनीदेखील मागील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. त्यांनी विकासकामांची यादी घेवून मते मागितली आहेत.

हुक्केरी 

आ. उमेश कत्ती सलग आठव्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरोधात माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी काँग्रेसकडू तगडे आव्हान उभे केले आहे. रिंगणात  अन्य उमेदवार असले तरी प्रमुख लढत  भाजप व काँग्रेसमध्ये रंगणार आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असून राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या उमेदवाराकडे समर्थकांचा अधिक प्रमाणात भरणा आहे. आ. उमेश कत्ती यांच्या नावाचा मतदारसंघात करिष्मा आहे. त्या जोरावर त्यांचा विजय सोपा असल्याचा दावा भाजपचा आहे. मात्र पाटील हे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे आणि प्रतिमा स्वच्छ असल्यामुळे ही लढतही ‘हाय प्रोफाईल’ बनली आहे. 

बेळगाव ग्रामीण

जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ म्हणून ग्रामीण मतदारसंघाकडे पाहिले जाते. मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून म. ए. समिती,  काँग्रेस, भाजप उमेदवारांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.

म. ए. समितीतर्फे माजी आ. मनोहर किणेकर रिंगणात आहेत. अनेक वर्षे सातत्याने अनेक समस्या घेऊन त्यांनी मतदारसंघ ढवळून काढला आहे. त्याचबरोबर सीमाप्रश्‍नाच्या न्यायालयीन कामकाजात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फार मोठी फळी असून विजयासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

भाजपचे आ. संजय पाटील उमेदवार असून त्यांनी  हिंदुत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी रान पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.   लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांनी विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी याठिकाणी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तर भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेवून वातावरण निर्मिती केली आहे. 

खानापूर 

म. ए. समितीचे सातत्याने वर्चस्व असणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यावेळी म. ए. समितीसमोर तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजप, काँग्रेस व निजदच्या उमेदवारांनी केले आहे. 
म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आ. अरविंद पाटील मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा नशिब आजमावत आहेत. त्यांना बंडखोर उमेदवार विलास बेळगावकरांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. 

काँग्रेसतर्फे डॉ. अंजली निंबाळकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी काँग्रेस सरकारच्या सत्तेचा वापर करीत आणि वैयक्तिरित्या अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्याचा त्यांना फायदा होईल, असा दावा निंबाळकर करीत आहेत. भाजपचे विठ्ठल हलगेकर व बंडखोर उमेदवार जोतिबा रेमाणी निवडणूक लढवित आहेत. निजदचे नासीर बागवान यांनीदेखील विजयाचा दावा केला आहे. 

यमकनमर्डी 

माजी पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांची कसोटी लागली आहे.  राखीव असणार्‍या या मतदारसंघातून तिसर्‍यांदा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित आहेत. त्यांना येथून विजयाची खात्री आहे.

जारकीहोळी यांच्याविरोधात भाजपने मारुती अष्टगी यांना उमेदवारी दिली आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत अष्टगी यांचा जारकीहोळी यांनी पराभव केला होता. पुन्हा एकदा जारकीहोळींच्या विरोधात अष्टगी यांनी शड्डू ठोकला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेवून काँग्रेसवर टीकेची झोड उठविली आहे.

जारकीहोळी यांनी मतदारसंघात राबविलेल्या विकासकामामुळे विजयाबाबत ते निर्धास्त आहेत. मात्र, त्यांच्या पी. ए. संस्कृतीमुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांपेक्षा पी. ए. ना अधिक महत्त्व दिले जाते, असा आरोप आहे. पण विकासकामांच्या बाबतीत ते मागे नाहीत. त्यामुळे त्यांच्या मतात घट झाली तरी भाजप आव्हानापुरता राहील, असे मानले जाते.