Mon, Dec 09, 2019 10:58होमपेज › Belgaon › बेळगाव: उमेदवारीबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे नजरा

बेळगाव: उमेदवारीबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे नजरा

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:30AMबेळगाव ः प्रतिनिधी

बेळगाव दक्षिण, ग्रामीण व उत्तर मतदारसंघामध्ये प्रत्येकवेळी मराठी समाजाची मते निर्णायक ठरत आली आहेत. मात्र, आतापर्यंत या तिन्ही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाला भाजप, काँग्रेस किंवा जनता दलाने डावलले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती वगळता इतर समाजातील व्यक्तींनाच उमेदवारी मिळत आली आहे. 

सध्या बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसने लक्ष्मी हेब्बाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तरमध्ये काँग्रेसकडून विद्यमान आ. फिरोज सेठ यांनाच उमेदवारी मिळणार आहे. तर बेळगाव दक्षिणमध्ये काँग्रेसकडून तुमकूरचे आ. लक्ष्मीनारायण यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. बेळगाव तालुक्यात बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजाकडे राष्ट्रीय पक्ष्यांचे दुर्लक्ष होत आहे. बेळगाव ग्रामीण आणि उत्तरमध्ये जर अन्य समाजाला प्रतिनिधीत्व मिळत असेल तर बेळगाव दक्षिणमध्ये काँग्रेसकडून मराठा समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जो काही फटका बसला त्यानंतर एकाही मराठी व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली नाही. यावेळी बेळगाव दक्षिणमधून काँग्रेसने मराठी समाजातील व्यक्तीला तिकीट देण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याकडे काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबरच बेळगावातील प्रभावी नेतृत्व असलेल्या राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर व जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

बेळगाव दक्षिणमधून काँग्रेसतर्फे जयराज हलगेकर, राजेश जाधव, युवराज कदम या मराठा समाजातील उमेदवारांनी तिकिटासाठी मागणी केली आहे. मात्र, त्यांना वगळून तुमकूरमधील लक्ष्मीनारायण यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा फटका बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीणमधून जि.पं.सदस्य मोहन मोरे व जि.पं.सदस्य रमेश गोरल हे मराठा समाजातील युवा नेते इच्छुक आहेत. पण यापूर्वीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव बेळगाव ग्रामीणमधून घोषित केले आहे. उत्तरचे आ. फिरोज सेठ यांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले आहे. 

...अन्यथा वेगळा पर्याय निवडण्याचा निर्णय

सर्व राष्ट्रीय पक्षांना मदत करणार्‍या मराठा समाजाला प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वीच मराठी समाजातील काही नेत्यांची गुप्त बैठक झाली असून तीनपैकी एका मतदार संघात उमेदवारी न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच काँग्रेसचे शिवनगौडा पाटील हे ‘निजद’मध्ये गेल्याने त्यांचा फटकाही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने तीनपैकी एका मतदारसंघात मराठा समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्यास पुन्हा ये रे माझ्या... ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.