Mon, Dec 09, 2019 11:00होमपेज › Belgaon › राज्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’

राज्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’

Published On: Jun 28 2019 1:32AM | Last Updated: Jun 28 2019 1:32AM
विजापूर : प्रतिनिधी

दोड्डबळ्ळापूर येथे संशयित दहशतवाद्याला अटक केल्याने संपूर्ण राज्यात ‘हाय अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संशयित दहशतवादी बांगला देशातील जमात उल मुजाहिद्दिन संघटनेचा सदस्य आहे. राज्यामध्ये घातपात घडवण्याच्या संशयावरून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. बंगळूरपासून 600 कि. मी. अंतरावर दोड्डबळ्ळापूर आहे. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) संशयित दहशतवाद्याला पकडून त्याची चौकशी केली असता काही महत्त्वाची माहिती मिळाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव ती जाहीर करता येत नसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. याविषयी सीआयडी अधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हाय अ‍ॅलर्ट जारी केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील संशयित दहशतवादी हबीबुर रेहमान याने राज्यातील विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. चौकशीवेळी त्याने दिलेल्या माहितीवरून रामनगरातील नाल्यात दोन जिवंत बॉम्ब सापडले. एका महिन्याआधी हबीबुरने रामनगरातून दोड्डबळ्ळापूर येथे स्थलांतर केले. त्यावेळी त्याने बिडदीतील मंचनायकनहळ्ळी येथे खड्ड्यामध्ये एक बॉक्स फेकून दिला होता. संशयित दहशतवादी मुनीर ऊर्फ कौसरने त्याला तशी सूचना दिली होती. त्यानुसार एनआयएने पोलिस व अग्‍निशामक दलाच्या मदतीने त्या बॉक्सचा शोध घेतला; पण बॉक्सऐवजी दोन जिवंत बॉम्ब सापडले.