Sat, Dec 14, 2019 05:58होमपेज › Belgaon › संघर्ष थोडाफार, स्थलांतर पार

संघर्ष थोडाफार, स्थलांतर पार

Published On: May 15 2019 1:50AM | Last Updated: May 15 2019 12:26AM
बेळगाव : प्रतिनिधी

किल्ला मार्केट व्यापार्‍यांनी शांततेने एपीएमसीमध्ये स्थलांतर न केल्यास 144 कलम लावून स्थलांतर करण्यास भाग पाडू, असा इशारा देणार्‍या पोलिस प्रशासनाने मंगळवारी मोठा बंदोबस्त लावून किल्ला भाजी मार्केट व्यापार्‍यांचा विरोध मोडून काढला. त्यामुळे किल्ला मार्केटचे काही व्यापारी आणि पोलिसांत बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने व्यापार्‍यांनी नरमाई स्वीकारावी लागली. परिणामी थोड्या संघर्षानंतर भाजी मार्केटच्या अनेक व्यापार्‍यांनी एपीएमसीमध्ये स्थलांतर केले.

किल्ल्यातील जय किसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनला एपीएमसीमध्ये स्थलांतरित होण्याची सूचना शनिवारी एपीएमसीत झालेल्या संयुक्‍त बैठकीत करण्यात आली होती. मात्र त्याला विरोध करत किल्ला मार्केट व्यापार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. 

तथापि, मुख्यमंत्री कुमारस्वामी, जिल्हाधिकारी डॉ. विशाल आर. यांनी यापूर्वीच किल्ला भाजी मार्केट एपीएमसीत स्थलांतरित करण्याचा आदेश दिला होता.  त्यानुसार मंगळवारी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. किल्ला भाजी मार्केट प्रवेशद्वारावर पोलिसांची 100 जणांची तुकडी तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय विरोध झालाच तर अटकसत्र राबवण्यासाठी गाड्याही मागवण्यात आल्या होत्या.

त्याचबरोबरच मार्केटमध्ये येणारी भाजीवाहू वाहने एपीएमसीकडे पाठवण्याचे कामही पोलिस करत होते. तिकडे एपीएमसीच्या मुख्य गेटवरही पोलिसांची गाडी थांबून होती. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे किल्ला मार्केट व्यापार्‍यांचा विरोध मावळला. 

एपीएमसीत आवक
किल्ला मार्केटमध्ये सकाळपासून दोडकी, मिरची, टोमॅटो, पालक, कोथिंबीर, कोबी या भाज्यांच्या गाड्या येण्यास सुरूवात झाली होती. मात्र बंदोबस्तावरच्या पोलिसांनी त्या गाड्या एपीएमसीला पाठवल्या. त्यामुळे एपीएमसीत पहिल्याच 207 गाड्या दाखल झाल्या.  पहिल्या पाच गाड्यांचे फटाके वाजवून आणि घोषणा देऊन एपीएमसी प्रवेशद्वारा स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी सर्व शेतीमालाची उचल झाली आहे, अशी माहिती एपीएमसी अधिकार्‍यांनी दिली.

एपीएमसीच्या अधिकार्‍यांची पाहणी
शेतकर्‍यांनी बाजारात शेतीमाल आणल्यानंतर एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील, उपाध्यक्ष सुधीर गड्डे, सदस्य युवराज कदम, माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, सचिव गुरूप्रसाद एच. आदींनी जाऊन पाहणी केली.  

व्यापार्‍यांनी नवीन गाळ्यातून इलेक्ट्रिक वजन काटा लावले आहेत. त्या काट्यांवर शेतीमाल थेट उतरवून वजन केले गेले. शिवाय शेतकर्‍यांकडून कोणतीही तक्रार येऊ नये, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. किल्ला भाजी मार्केट मधील उर्वरित व्यापार्‍यांनी एपीएमसीत येऊन व्यवहार करावा. परवाना नंतर दिला जाईल. व्यापार्‍यांना तातडीने जागेची सोय केली जाईल, असे एपीएमसीतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

एपीएमसीत भाजीपाल्यांचा बाजार स्थलांतरित झाल्याने आनंदी झालो आहे. यापूर्वी किल्ला भाजी मार्केटमध्ये शेतीमाल कुठेही उतरला जात असे. त्यामुळे दर मिळत नव्हता. 
-बाळू  पाटील, शेतकरी


एपीएमसीतच बाजार भरावा अशी मागणी होत होती. मात्र शेतकर्‍यांना वाहतुकीचा खर्च तसेच, हमाली, दलाली  जादा द्यावी लागत असे. आता शेतकर्‍यांचा थोडा खर्च वाचेल.
-सुरेश तारीहाळकर, शेतकरी

किल्ला भाजी मार्केटमध्ये पावसाळ्यात दलदल होत असे. शिवाय योग्य भाव मिळत नव्हता. शेतकर्‍यांच्या शेतीमालास योग्य भाव  एपीएमसीमध्ये मिळावा. 
-रामलिंग पाटील, शेतकरी 

एपीएमसीत पहिल्याच दिवशी शेतीमाल घेऊन आलो आहे. एपीएमसीत जागाही भरपूर आहे. शेतीमाल ठेवण्यास अडचण नाही.  शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीमाल येथेच घेऊन येतील. 
-सचिन शिंदे, शेतकरी

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
किल्ला मार्केटमधील सारेच व्यापारी जोपर्यंत एपीएमसीत स्थलांतरित होत नाहीत, तोपर्यंत पोलिस फौजफाटा तैनात ठेवा आणि मार्केट उघडू देऊ नका, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विशाल आर. यांनी दिला आहे. त्यामुळे उद्या (बुधवारीही) दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात राहील, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.