Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › अंजली निंबाळकर यांची काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड

अंजली निंबाळकर यांची काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड

Published On: Mar 13 2018 4:40PM | Last Updated: Mar 13 2018 4:40PMबेळगाव : प्रतिनिधी 

राज्य बालभवनच्या अध्यक्षा आणि केपीसीसी सदस्या डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांची एआयसीसीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून त्यांच्या संमतीने काँग्रेस पक्षाच्या सेंट्रल इलेक्शन ॲथोरीटेचे अध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या निवडी बद्दल अंजली निंबाळकर यांनी ‘माझी ही निवड पक्षासाठी काम करणाऱ्या खानापूर तालुक्यांतील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली. निवडीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठी राहूल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री  सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डॉ. जी परमेश्वर, मल्लिकार्जुन खर्गे, सतीश जारकीहोळी,  एआयसीसी सेक्रेटरी व बेळगाव जिल्हा पालक मंत्री  रमेश जारकीहोळी यांचे विशेष आभार मानले. राज्यातील निवडणूकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या निवडीमुळे खानापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले असून योग्य वेळी केलेली ही निवड हा खानापूरच्या राजकारणातील एक महत्वाचा संकेत असल्याचे बोलले जात आहे. 

बालभवन कर्नाटकच्या अध्यक्षपदाच्या रुपाने प्रथमच खानापूर तालुक्याला महामंडळांच्या यादीत प्रतिनिधीत्व मिळाले होते. याचप्रमाणे आज इतिहासात प्रथमच खानापूर तालुक्याला एआयसीसीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या बद्दल डॉ. अंजलीताईंचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.