Thu, Dec 12, 2019 22:15होमपेज › Belgaon › आरटीओची झाडाझडती 

आरटीओची झाडाझडती 

Published On: May 01 2019 1:39AM | Last Updated: Apr 30 2019 11:44PM
चिकोडी : प्रतिनिधी

येथील आरटीओवर सोमवारी एसीबीने छापा टाकला. आरटीओमधील  अधिकारी, कर्मचारी व एजंटांची एसीबीने अक्षरशः झाडाझडती घेतली. पळून जाणार्‍या एजंटांना पकडून कार्यालयात आणून त्यांची चौकशी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सुमारे 27 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता एसीबीने वर्तविली. त्यांच्याकडून 5 लाखांवर रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.
चिकोडी शहराबाहेर कार्यरत असलेल्या आरटीओ कार्यालय परिसरात दुपारी पावणेदोनच्या सुमारास बेळगाव येथील एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे) पथक पाच वाहनांनी दाखल झाले. नेहमी एजंटांचा सुळसुळाट असल्यामुळे आलेल्या अधिकार्‍यांची वाहने पाहून परिसरातील सर्व एजंटांनी पलायनाचा प्रयत्न केला.   यावेळी पथकातील कर्मचार्‍यांनी सर्व एजंटांना पाठलाग करूनताब्यात घेतले तर काही एजंट पळून गेले. यामुळे नेहमी एजंट व नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या आरटीओ परिसरात भीतीसह शुकशुकाट जाणवत होत. पथकाने एजंटांना ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालयाकडे कारवाईचा मोर्चा वळविला. तेथे 40 हून अधिक एजंटांकडील  पैसे, कागदपत्रे, फाईली, बॅगांची झडती घेतली व आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांची देखील चौकशी केली. 

भ्रष्टाचाराची बजबजपुरी 

चिकोडी शहरात असलेल्या या आरटीओ कार्यालयात  एजंटांशिवाय सामान्य वाहनधारकांची कामे होत नाहीत. अधिकारी, कर्मचार्‍यांपेक्षा एजंटांचीच संख्या अधिक दिसून येते. येथे  एजंटांना गाठून पैसे दिल्यानंतरच फाईल पुढे सरकतात. यापूर्वी अनेकदा कारवाई झाली, तरी पुन्हा तोच कित्ता येथील कर्मचारी गिरवतात. यामुळे या कार्यालयात राजरोसपणे भ्रष्टाचार व एजंटराज सुरु असते. 

एसीबीचे पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे डीवायएसपी जे. रघु यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विश्‍वनाथ के., यल्लाप्पा धरनाईक, अडव्याप्पा गुदीगोप्प,  कर्मचारी  डी. ए. जाधव,  बाळू यलीगार, रवी मावरकर, डी. सी. गौडर, आर. जी. पाटील, एल. एस. होसमनी, अडीवेप्पा गस्ती, यांच्यासह 30 हून अधिक कर्मचार्‍यांकडून कारवाई झाली. 

या कारवाईत एजंटांकडून व कर्मचार्‍यांकडून पाच लाखाहून अधिक रक्कम कागदपत्रे हाती लागली आहेत. पण कारवाईत जप्त रक्कम, मुद्देमालाविषयी विचारणा केली असता अद्याप झडती सुरु असून नंतर माहिती देण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी  सांगितले. सदर कारवाई दुपारी 2 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.