Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Belgaon › पैशांसाठी युवकाचा भोसकून खून

पैशांसाठी युवकाचा भोसकून खून

Published On: Jun 03 2018 1:30AM | Last Updated: Jun 03 2018 1:23AMबेळगाव : प्रतिनिधी

कॅमेरा खरेदीसाठी मध्यस्थी केल्याने उर्वरित पैसे न दिल्याच्या क्षुल्‍लक कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी नेहरूनगर येथे उघडकीस आली. गणेश ऊर्फ  बसवराज यल्‍लाप्पा काकती (वय 22, सध्या रा. नेहरूनगर पहिला क्रॉस, मूळचा नेलगट्टी ता. गोकाक) असे मृत तरुणाचे नाव आहे. एपीएमसी पोलिसांनी पंचनामा करून तपास हाती घेतला आहे.

बसवराज नेहरूनगर येथे  काकाकडे राहायला होता. तो सेल्समन होता. शुक्रवारी रात्री जेवण करून तो घरातून बाहेर फिरावयास गेला होता. रात्री उशीर झाला तरी तो परतलाच नाही. सकाळी बसवण्णा मंदिराशेजारील पीके क्‍वॉर्टर्स येथे त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. निरीक्षक रमेश हनापूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. पोलिसांनी खात्री करून  मृतदेह बसवराजचा असल्याचे स्पष्ट केले. मृतदेहाच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राचे वार होते. घटनास्थळी पोलिस आयुक्‍त डी. सी. राजाप्पा यांनी  पाहणी केली. गुन्हे विभागाचे डीसीपी बी. एस. पाटील, मार्केट एसीपी विनय गावकर आदी अधिकारीही उपस्थित होते. 

संशयितांची चौकशी सुरू

पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुरज शिंदे व मनोज नेसरकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.