Sun, Dec 08, 2019 21:48होमपेज › Belgaon › तरुणांनो, कुस्तीकडे करिअर म्हणून पाहा! : कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार 

तरुणांनो, कुस्तीकडे करिअर म्हणून पाहा! : कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार 

Published On: Jul 19 2019 2:13AM | Last Updated: Jul 19 2019 12:21AM
बेळगाव : संदीप तारिहाळकर

अलिकडील काळात कुस्तीलाही व्यवसायिकता येऊ लागली आहे. तरुणांनी कुस्तीकडे करिअर म्हणून पाहावे, असा सल्‍ला देत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांनी दिला. तसेच भारतीय सैन्यदलातही मोठ्या संधी आहेत, असे मत व्यक्‍त केले. 

मूळचे मांडेदुर्ग (ता. चंदगड) व येथील मराठा लाईट एन्फंट्री सेंटरचे सुभेदार व कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत रामचंद्र पवार यांनी थायलंड येथे भारतीय ज्युनियर महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी दै. पुढारी कार्यालयास भेट देऊन कुस्तीविषयी मनोगत व्यक्‍त केले. 

प्रश्‍न : पालकांना काय संदेश द्याल ?
उत्तर : प्राथमिक पातळीवरील शारिरीक तंदुरुस्ती व देशासाठी पदके प्राप्त करण्यासाठी तरुणांसह तरुणींना पालकांनी कुस्तीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

प्रश्‍न : कुस्तीला व्यावसायिकता येत आहे का?  
उत्तर : कुस्ती स्पर्धेला देशात तीन वर्षापासून व्यावसायिकताही निर्माण होत आहे. महाराष्ट्रात प्रो कुस्ती लिग भरवल्यामुळे खेळाडूंच्या अर्थकारणाला चांगले दिवस आले आहेत. भारतीय कुस्ती महासंघातर्फे देशात यंदा तिसरी प्रो कुस्ती लिग भरविण्यात येणार आहे. देशात विविध कंपन्यांकडून कबड्डीपटूंना प्रायोजक मिळत आहे.  बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर आहे. याचा लाभ कुस्तीपटूंना होत आहे. तसेच जिल्हा स्तरावरही राज्य सरकारची प्रशिक्षण केंद्रे आहेत. 

प्रश्‍न : सैन्यदलाच्या बाईज स्पोर्ट्स कंपनीचे उद्दिष्ट काय? 
उत्तर : केंद्र सरकारच्या  साई प्रशिक्षण केंद्रांतर्गत सैन्यदलाची बॉईज स्पोर्टस् कंपनी आहे. या कंपनीची देशात अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत. येथे वर्षातून दोन वेळा निवड केली जाते. सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. पुणे येथे आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटमध्ये कुस्तीसह 7 खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. येथे ग्रामीण कुस्तीपटूंना मोठ्या संधी आहेत. या सेंटरचे ध्येय केवळ ‘मिशन ऑलम्पिक’ असेच आहे. 

प्रश्‍न : खेळामध्ये जिल्ह्याचे महत्त्व काय आहे? 
उत्तर : बेळगाव जिल्ह्यातून अनेक कुस्तीपटू राष्ट्रीय स्तरावर आहेत. 2016 साली किणये येथील सैन्यदलाचे सुभेदार यांनी एशियन गेम्समध्ये 55 कि. गटात ग्रीका रोमन या कुस्ती प्रकारात कास्यपदक तर कंग्राळी येथील हवाईदलाचे एम. आर. पाटील यांनी 1992 मध्ये कुस्तीमध्ये ऑलम्पिक स्पोर्टस्मध्ये सहभाग घेतला आहे. 

प्रश्‍न : आतापर्यंत कोणकोणत्या देशात प्रशिक्षणाची संधी मिळाली? 
उत्तर : उझबेकीस्तान, बोस्मिया (युरोप), क्रोएशिया, अर्जेंटिना, बेलारूस, रशिया, थायलंड यासह देशात अनेक ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. 

प्रश्‍न : आजपर्यंतची तुमची सर्वोत्तम कामगिरी कोणती?
उत्तर : 3 सप्टेंबर 2018 साली अर्जेंटिना येथे झालेल्या युथ ऑलम्पिक गेम्समध्ये माझी संपूर्ण भारतातून कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे, असे मला वाटते.

प्रश्‍न : सेवानिवृत्तीनंतर कुस्तीसाठी काय करु शकाल?
उत्तर : निवृत्तीनंतर माझ्या मूळ गावी मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्राची उभारणी सुरु आहे. या माध्यमातून सामान्य कुटुंबातील कुस्तीपटूंना चांगले व्यासपीठ मिळवून देऊ.