Sat, Jun 06, 2020 14:16होमपेज › Belgaon › वन्यप्राणी लोकवस्तीत 

वन्यप्राणी लोकवस्तीत 

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 10:51PM

बुकमार्क करा

खानापूर : राजू कुंभार

तालुक्याच्या  पश्‍चिम आणि दक्षिण भागाला  जंगल-झाडीने वेढले असल्याने दरवर्षी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा सामना नागरिकांना करावा लागतो. यापूर्वी वन्यप्राणी मोठ्याप्रमाणात पिकांची नासाडी अथवा लोकवसतीत येत नव्हते. मात्र आताच ते जंगल सोडून लोकवसतीत का येत आहेत, याचा विचार केला असताता नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये खंड पडत असल्याने ते अन्नाच्या शोधात नागरीवस्तीत येत असल्याचे सिध्द झाले आहे.

वन्यप्राण्यांच्या आहाराची आणि पाण्याची व्यवस्था जंगलातच लावल्यास प्राणी नागरी वसतीत येणार नाहीत. मात्र, त्यासाठी वनखात्याकडून तसे प्रयत्न होण्याची गरज आहे. जंगलात होणारा मानवाचा हस्तक्षेप रोेखण्यासाठी उपाययोजना  आखण्याबरोबर त्याचे पालनही होणे गरजेचे आहे. अन्नसाखळी ही वनस्पती पासून सुरू होऊन हत्ती, वाघ, अस्वल याबरोबर मानवापर्यंत येवून पोहचते. मात्र, मानवाच्या जंगलातील अनावश्यक हस्तक्षेपामुळे यात खंड पडत असल्याचे दिसून येते. वनखात्याने प्राण्यांना लागणार्‍या वनस्पतींची, फळझाडांची तसेच पाण्याची उत्तम व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे. 

अस्वल : 

याचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी प्रामुख्याने हा प्राणी मुळे, मासे, मध, बांबूचे कोंब, करवंद, मुंग्या खातो. अस्वल एक किमीवरील वास ओळखू शकते. याच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

रान गवा- पाण म्हैस: 

तालुक्यात रानगवे आणि  पाण म्हैस  मोठ्याप्रमाणात आहेत. त्यांच्या कडून  पिकाचे अधिक नुकसान होते. गवा आणि पाण म्हैस यांना प्रामुख्याने बांबूचा पाला, नदी काठचे गवत, बाभळीची पाने, गवताची कुरणे तसेच पाण्याची व्यवस्थाही आवश्यक असाहे.

माकड (वानर) : 

जंगलातून  येणार्‍या मोठ्या माकडांपासून (वानर) भात आणि फळभाज्यांचे नुकसान होते. त्यांच्यासाठी जंगलात विविध फळांची झाडे लावणे गरजेचे आहे. प्रामुख्याने आंबा, केळी, फणस, चिकू, हळ्ळू, चापरे, असोळ्या यासारख्या फळांच्या झाडांची लागवड आवश्यक आहे.

हत्ती : 

बांबू नष्ठ झाल्याने तसेच पाण्याच्या अभावानेही हत्तींचा नागरी भागात संचार वाढला. त्यासाठी जंगलात तलावांची निर्मिती तसेच बांबू, रानकेळी, ताडी व माडीची झाडे, विविध प्रकाराचे गवत आणि पानझाडी वनस्पतींची लागवड मोठ्याप्रमाणात करण्याची गरज आहे.

किंग कोब्रा : 

अलिकडे भीमगड अभयारण्याच्या परिसरातील गावांत किंग कोब्राचे (नागसाप) दर्शन घडले.  प्रामुख्याने हा साप छोटे धामण, घोनस, हिरवाटी यासारखे साप खातो, पाली, सरडे,  छोटे पक्षी हे त्याचे आवडते खाद्य. जंगलातील वणव्याने त्याचे हे खाद्य कमी झाले आहे.

वाघ-बिबट्या ः

भीमगड अभयारण्यात वाघ आणि बिबट्यांची  संख्या वाढल्याने आहारा अभावी तेही नागरी वस्तीत येत आहेत. सांबर, हरीण, चितळ, भेकर, रानडुक्कर, गवा हे त्यांचे प्रमुख  खाद्य. मात्र अशा प्राण्यांची नागरीकांकडून शिकार होत असल्याने ते मानवी वसतीत घुसत आहेत.