Sun, Dec 15, 2019 06:39होमपेज › Belgaon › साकवांची सोबत संपणार तरी कधी ?

साकवांची सोबत संपणार तरी कधी ?

Published On: Jul 11 2019 1:29AM | Last Updated: Jul 11 2019 12:41AM
खानापूर : वासुदेव चौगुले

वीज आणि शाळा याव्यतिरिक्त सरकारची कोणतीही सोय उपलब्ध नसताना तक्रारीचा सूर न आळवत बसता हलाखीच्या परिस्थितींचा सामना करणार्‍या गवाळी, कोंगळा, पास्टोली या गावच्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः मरणयातनांचा सामना करावा लागत आहे. डिजिटलपर्व आणि बुलेट ट्रेनच्या जमान्यात आणखी किती दिवस असे जगावे लागणार, असा सवाल या भागातील जनतेतून विचारला जात आहे.

तालुक्याच्या अतिटोकावर वसलेल्या गवाळी, कोंगळा आणि पास्टोली या गावांना जोडणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात भांडुरा नाल्याला पाणी आल्याने बंद झाला आहे. नागरिकांनी श्रमदानातून साकवाची उभारणी करुन जगण्यासाठीचा कसातरी प्रवास सुरू ठेवला आहे.स्वातंत्र्यानंतर अद्याप या तिन्ही गावांना रस्ता आणि संपर्काची साधने पोहचली नाहीत. वनखात्याच्या अडवणुकीमुळे रस्त्याचा विकास आणि पुलाच्या उभारणीला अडसर निर्माण झाला आहे. याप्रश्‍नी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन किमान रुग्नवाहिका जाईल. इतक्या रुंदीचा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकार व वनविभागाचे डोळे उघडले नसल्याने यावर्षीचा पावसाळाही जनतेला बिगर रस्ता आणि बिगर पुलाविनाच काढावा लागणार आहे.

गवाळीला जाणार्‍या रस्त्यावर भांडुरा नाला आणि म्हादई नदीचे पात्र लागते. त्यापैकी म्हादई नदीवर नासीर बागवान यांच्या प्रयत्नातून लोखंडी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी पल रस्त्याला जोडल्यास या पुलावरुन दुचाक्यांची वाहतूक सुरु होऊ शकते. पण भांडुरा नाल्यावर अध्याप पुलाची उभारणी झाली नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदीपात्र पार करावे लागते.

दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी तिन्ही गावचे नागरिक एकत्र येऊन श्रमदानाने लाकडी साकवाची निर्मिती करतात. नाल्याच्या काठावरील झाडांचा आधार घेऊन साकवाची उभारणी केली जाते.  साकवाच्याबाजुने कोणतीही संरक्षण यंत्रणा नाही. परिणामी पाण्याचा जास्त प्रवाह असताना साकवावरुन नदीपात्र पार करणे धोक्याचे ठरु शकते. तालुक्याच्या अन्य भागापेक्षा या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. विशेषकरुन विद्यार्थी व महिलांना दवाखाना व अन्य कामांसाठी शहराकडे येत असताना धोकादायक नदी-नाला पार करुन येणे नकोसे वाटत आहे.

दहा गावांना बेटाचे स्वरूप

पश्‍चिम भागात धुवांधार अतिवृष्टी सुरू असल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा, कृष्णापूर, तळेवाडी, मेंडील, व्हळदा यासह वाड्यांचा समावेश असलेल्या दहा गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कृष्णापूर मार्ग पानशिरा नाल्याच्या प्रवाहात बुडाला आहे. मेंडील याठिकाणीही पानशिर्‍याला पाणी आल्याने तीन वाड्यांचा गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. व्हळदावासीयांना गोव्यातून चार साकव पार करुन बाजारहाट करावा लागत आहे. तळेवाडी आणि पास्टोलीवासियांचीही हीच अवस्था आहे.

आशा अन् घोर निराशा

गवाळी गावाला जोडणार्‍या रस्त्याचे व नव्या पूल उभारणीचे काम मंजूर होईपर्यंत नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबावा यासाठी भांडुरा नाल्यावर किमान फूटब्रिज तरी उभारण्यात यावे, अशी जनतेची मागणी आहे. दोन वर्षापूर्वी लोखंडी फूटब्रिजसाठी अनुदान मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कार्यवाही न झाल्याने जनतेच्या पदरी पुन्हा घोर निराशा आली आहे.