Mon, Jul 13, 2020 06:35होमपेज › Belgaon › लग्नसंस्कृती हायफाय, जुन्या रीती कालबाह्य

लग्नसंस्कृती हायफाय, जुन्या रीती कालबाह्य

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 29 2019 12:08AM
बेळगाव : प्रतिनिधी

सध्या पैशाचा ओघ वाढल्याने हायफाय लग्नसंस्कृती रूजत चालली आहे. त्यातच जुने रितीरिवाज कालबाह्य होत आहेत. सुपारी, उखाणा, कोपर, वरमायेकडून कांजणी घेणे,कान पिळणे, मधलास, वाकळ देणे अशा प्रथा बंद पडल्या आहेत. या प्रथा टिकाव्यात अशी मानसिकताही दिसत नसल्याने आता या सार्‍या बाबी आठवणीपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. 

पूर्वी मेहंदीच्या झाडास मोहोर लगटला की तो काढून ठेवला जायचा. नवरा- नवरीची दृष्ट काढताना त्याचा वापर केला जात असे. नव्या पिढीस याबाबत काहीच माहिती नाही.सध्या वराला संसारोपयोगी साहित्य देताना पलंग- गादी दिली जाते.पण पूर्वी हस्तकलेने साकारलेली वाकळ देण्याची प्रथा होती. माहेरची उब वधूला नवी उर्जा देत असे. सुपारी सोडणे व कोपर मारणे या प्रथांचा तर सध्या विसर पडलेला दिसत आहे.कधीकाळी या गोष्टी झाल्याशिवाय लग्नाचे पान हलत नसे. हा प्रसंग वधू- वरांसह बघ्यानाही रोमांचक असायचा. अक्षता पडल्यावर जेवण झाले की वराच्या मित्रांचा गराडा पडायचा. कोणीतरी वराच्या हातात सुपारी द्यायचा. संभाव्य प्रकाराची जाणीव होवून वर शरमिंदा व्हायचा. सुपारी मुठीत कशी धरायची आणि उखाणा घेवून  वधूला काय म्हणायचे, याचा पाठ धेडा वराला द्यायचा.

टाळाटाळ करीत वर मुठीत सुपारी आवळून वधूच्या मांडीवर ठेवायचा. उखाणा घेतला की नवरीचं नाव घेवून म्हणायचे, माझी मूठ सोड. वधू लाजेने चूर व्हायची.धेडी आणि तिच्या मैत्रिणी वधूच्या कानात  काहीतरी पुटपुटायच्या. यात बराच वेळ जायचा. तिष्ठत उभे राहिलेले वर्‍हाड वधू-वराला भंडावून सोडायचे. अखेरीस सहनशीलतेचा अंत पाहून वधू मनाचा हिय्या करायची आणि वराची मूठ सोडायची झटापट सुरू व्हायची.वधूने वराची मूठ सोडून सुपारी आपल्या ताब्यात घेतली की बघी पोरं जल्लोष करायची.बायको तुला मुठीत ठेवणार म्हणून वरास हिणवायची. नंतर वधू मुठीत सुपारी आवळून ती सोडविण्याचे वरास आव्हान द्यायची. यानंतर नवरदेवास वधूला कोपर मारण्याचा आग्रह व्हायचा.वर वधूला डाव्या कोपराने ठोसा हाणायचा.  अचानक बसलेल्या धक्क्याने वधू सर्द व्हायची. हास्याची लकेर मांडवात घुमायची.

उखाणा घेणे ही प्रथा तर अनिवार्य होती. उखाणा घेतल्याशिवाय जमलेले कोंडाळे हटत नसे. वीस वर्षापूर्वी बोहल्यावर चढण्याआधी चारदोन उखाणे मोंडपाठ करूनच ठेवावे लागत.काही उखाणे शब्दसौंदर्याने परिपूर्ण व आशयघन असत. आता उखाणे ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे उखाण्यांची परंपरा अडगळीत जात आहे. आता लग्नानंतर दुसर्‍या दिवशी सत्यनारायण पूजा घातली जाते. पूर्वी मधलास हा प्रकार होता. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी वराच्या घरी सर्व पै-पाहुणे जमा व्हायचे. मग वधुवरांना दिवसभर बाशिंग बांधलेल्या अवस्थेत थांबावे लागायचे.

याशिवाय जुन्या लग्नकार्यात भेट म्हणून कोण बंद पाकिटे देत नसत. तांदूळ वधूवराच्या बाशिंगावर पाचवेळा टाकून भांडयाच्या रूपात भेटवस्तू दिली जात असे. त्याकाळी सोने स्वस्त असल्याने कोण जोडवी, मासुळ्या, छल्ला, मुगट, पैंजण असे ऐवज देत असत.

तांदळाचे माप ओलांडून वधूने सासरी प्रवेश करताना तर फारच मजा असायची. वधुवरांना घरात लवकर प्रवेश दिला जात नसे. वराचा भाउ खांदयावर दावण, चाबूक घेवून प्रवेशद्वारात हजर व्हायचा. मग प्रश्‍नोत्तरे रंगायची. वर विचारायचा, दादा, दरवाजा का अडवलास? यावर वराचा भाउ प्रतिप्रश्‍न करायचा, तुझ्या बायकोला विचार. मी शेतात औत घेवून गेल्यावर माझं जेवण घेवून येते का नाही? यानंतर वर वधूला तसे विचारायचा. नेहमीप्रमाणे होकारार्थी उत्तर यायचे. पण तोपर्यंत वराची बहिण दरवाजा रोखून धरायची. तिला नवा विचारायचा, ताई, तू का दरवाजा अडवलीस? यावर बहिण म्हणायची, तुझी पोरगी मागायला आलोय.देतोस का? नवरा मुलगा गोंधळून जायचा. लोकं हसायची आणि वराची बहिण म्हणायची, सोन्याची साखळी टाकीन दरवाजावरी, बंधू तुझी लेक नेईन जोरावरी...या प्रश्‍नालाही लाजत उत्तर दिल्यानंतर वधूवरांना घरात प्रवेश मिळायचा. लग्नाची धामधूम संपली की नवरा वधूच्या घरी चार ते आठ दिवस थांबायचा. आता धावत्या युगात इतका निवांतपणा वरमंडळींना नाही. मग जुन्या रितीरिवाजांचे जतन कसे होणार?