Tue, Dec 10, 2019 14:08होमपेज › Belgaon › बेळगावकरांना होतोय मृत साठ्यातून पाण्याचा पुरवठा

बेळगावकरांना होतोय मृत साठ्यातून पाण्याचा पुरवठा

Published On: Jun 05 2019 1:27AM | Last Updated: Jun 05 2019 12:20AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावला पाणी पुरवठा करणार्‍या राकसकोप जलाशयात केवळ अर्धा फूटच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता ज्याला आपण डेडस्टॉक म्हणतो, त्या मृत साठ्यातून शहराला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून या साठ्यातून चार अश्‍वशक्तीच्या चार मोटारींद्वारे पाणी उपसा करून त्याचा पुरवठा होणार आहे. पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास बेळगावकरांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट ठाकणार आहे. 

शहरातील प्रत्येक विभागाला दहा दिवसांआड पाणी मिळत होते ते आता पंधरवड्यावर जाण्याची भिती आहे. शिवाय ज्या 10 प्रभागांमध्ये चोवीस तास पाण्याचा प्रयोग सुरू आहे, त्या भागालाही गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पुढील आठवडाभरात मान्सूनचे आगमन न झाल्यास बेळगावकरांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

पाऊस लांबेल तसा राकसकोप जलाशयाने तळ गाठण्यास प्रारंभ केला आहे. चार दिवसांपूर्वी पाऊण फूट असलेली जलाशयाची पातळी  आता अर्ध्या फुटांवर गेली आहे. त्यामुळे जलाशयातील मृत पाणी साठ्याचा उपसा करण्याची वेळ पाणी पुरवठा मंडळावर आली आहे. याची आठवडाभरापासून तयारी सुरु आहे. मंगळवारी रात्री येथे चार अश्‍वशक्तीच्या चार मोटारी बसविण्यात आल्या असून  जलाशयातील मृत पाणी साठ्याच्या उपशाला प्रारंभ झाला आहे. 

हिडकल जलाशयातील पाणी पातळी देखील घटली आहे. या जलाशयात केवळ अर्धा टीएसी टीएमसी पााणी साठा शिल्लक आहे. तेथून थोडेफार पाणी राकसपोकमध्ये आणता येईल. परंतु, तो देखील संपला की शहरवासियांना कूपनलिका, विहिरी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. 6 जूनला मान्सूचे आगमन होईल, असा अंदाज आहे. चार दिवसांपासून केवळ ढग जमत आहेत परंतु, ते बरसत नाहीत. त्यामुळे फक्त शेतकरीच नव्हे, तर शहरवासियांची नजरही आता आकाशाकडे लागली आहे. 

टँकरचा दर दुप्पट 

वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी उपसा करण्यात अडचणी येत आहेत. 24 तास पाणी पुरवठा होणार्‍या दहा प्रभागांमध्ये देखील पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हॉटेल व्यावसायिक पाणी मिळविण्यासाठी टँकरच्या शोधात आहेत. विहिरी व कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या टँकर व्यवसायिकांना देखील पाणी मिळविण्यासाठी शहरापासून दहा ते  पंधरा किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळेच आधी 400 ते 500 रूपयांना मिळणारा पाण्याचा टँकर आता 800 ते 1000 रूपयांना मिळत आहे. 

शहरात उभारण्यात आलेल्या शुद्धपाणी पुरवठा केंद्रांमध्ये देखील पाणी नसल्याने नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहरात पाणी टंचाई निर्माण होऊन देखील टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. खरे तर प्रभागनिहाय टँकरची गरज आहे. परंतु, शहरातील लोक स्वतःहून टँकर मागवतात, असे समजून प्रशासन शहरासाठी पाणी पुरवठा करण्याची शक्यता धूसर बनली आहे.  

निसर्गावरच भरवसा  

2016 मध्ये जून संपला तरी  पाऊस नव्हता. राकसकोपच्या मृत साठ्याचे पाणी संपत आले, तरी पावसाचा थेंब नव्हता. तेव्हा जिल्हाधिकारी एन. जयराम यांना पत्रकारांनी पाण्यासाठी काय करणार? असे विचारले असता, आता भरवसा निसर्गावर आणि त्या परमेश्‍वरावरच, असे म्हणत गप्प राहणे पसंत केले होते. आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.