Fri, Jun 05, 2020 03:06होमपेज › Belgaon › चोरी करताना दोन महिलांना पकडले

चोरी करताना दोन महिलांना पकडले

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 17 2019 1:45AM
बेळगाव : प्रतिनिधी

लहान मुलांच्या मदतीने सराफी दुकानात चोरी करताना दोन महिलांना पकडल्याची घटना गुरुवारी सायं. 5 च्या सुमारास गणपत गल्लीत घडली. चोरीचा प्रकार लक्षात येताच दुकान मालकाने पोलिसांना बोलावून महिलांना त्यांच्या ताब्यात दिले.

प्राची ज्वेलर्समध्ये दोन महिला लहान मुलांसोबत खरेदीसाठी आल्या होत्या. त्यापैकी एका महिलेने हातचलाखीने दोन अंगठ्या चोरून सोबत आलेल्या मुलाकडे देत एक महिला बाहेर पडली. पाठोपाठ दुसरी महिला जात असताना हा प्रकार दुकानातील कर्मचार्‍याच्या लक्षात आला. त्याने त्या महिलेले अडविले व दुकानाचे शटर लावून बसवून घेतले. 

थोड्यावेळाने लहान मुलाला घेऊन बाहेर गेलेली महिला परत आली. तिलादेखील दुकानात बोलावून खडेबाजार पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र त्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत आपण चोरी केलीच नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये महिलेने चोरी केल्याचा प्रकार निदर्शनास आला. मुलाच्या खिशात पाहिले असता दोन सोन्याच्या अंगठ्या सापडल्या.

खडेबाजार पोलिसांनी  महिलांसह मुलाला ताब्यात घेत चौकशीसाठी पोलिस स्थानकात घेऊन गेले. दुकानातील चोरीचा मुद्देमाल परत मिळल्याने दुकान मालकाने त्या महिलांविरोधात पोलिसांत तक्रार केली नाही. रात्री उशिरापर्यंत त्या दोन महिलांची चौकशी सुरु होती.