Sun, Dec 15, 2019 03:45होमपेज › Belgaon › थरारक अपघातात ट्रक पेटला

थरारक अपघातात ट्रक पेटला

Published On: Apr 18 2019 2:02AM | Last Updated: Apr 17 2019 11:45PM
बेळगाव  : प्रतिनिधी

दुचाकीने ट्रकला पाठीमागून ठोकर दिल्यानंतर दुचाकी थेट ट्रकखाली घुसली. यावेळी दुचाकीची पेट्रोल टाकी फुटून उडालेल्या ठिणग्यांमुळे ट्रकला खालील बाजूस आग लागली. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काकतीजवळ बर्डे ढाब्यासमोर  बुधवारी सायंकाळी घटना घडली. यामध्ये दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले असून, ते कडोलीचे आहेत. 

जखमी झालेल्यांमध्ये सुनील शिवाजी भोगणे (वय 26), विवेक कृष्णा बिर्जे (16), रितेश पाटील (20, तिघेही रा. कडोली) यांचा समावेश आहे. महामार्गावरून ट्रक काकतीकडे जात होता. तर या ट्रकच्या मागून एका दुचाकीवरून तिघेजण भरधाव जात होते. दरम्यान, दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोराने धडक दिली. ही धडक इतरी जबरदस्त होती की दुचाकी ट्रकखाली घुसली. यावेळी तिघांनी धावत्या  दुचाकीवरून उडी मारल्याने ते बाजूला गेले, तर दुचाकी ट्रकखालूनच फरफटत पुढे गेली. यामुळे दुचाकीची पेट्रोल टाकी फुटली. तापलेला रस्ता  तसेच दोन वाहनांच्या घर्षणाने आगीच्या ठिणग्या उडाल्याने आग भडकली. यामुळे ट्रकच्या मागील बाजूने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रकमधुन काही नागरिक प्रवास करीत होते. आग लागल्याचे निदर्शनास येताच प्रवाशांनी ट्रकमधून उड्या मारल्या. यामुळे महामार्गावर काही काळ बराच गोेंधळ निर्माण झाला होता.

घटनेची माहिती अग्‍नीशामक दलाला देण्यात आली. अग्‍नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बर्‍याच प्रमाणात ट्रक  जळाला होता. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सदर ट्रक बेळगावहून पुणे सासवडला जात होता. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची नोंद रहदारी उत्तर विभाग पोलिस स्थानकात झाली आहे. घटनास्थळी काकती पोलिस निरिक्षक अर्जुन हंचिनमणी व सहकार्‍यांनी धाव वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.