Tue, Dec 10, 2019 14:12होमपेज › Belgaon › कलबुर्गी हत्येपूर्वी मंगळूर येथे प्रशिक्षण?

कलबुर्गी हत्येपूर्वी मंगळूर येथे प्रशिक्षण?

Published On: Jun 06 2019 1:34AM | Last Updated: Jun 06 2019 1:24AM
बंगळूर : प्रतिनिधी

विचारवंत साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या करण्याआधी संशयितांनी मंगळूरमध्येही शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा अंदाज विशेष तपास पथकाने व्यक्‍त केला आहे. 

2011 ते 2017 या काळात एकूण 13 प्रशिक्षण शिबिरे झाली. मंगळूर येथे प्रशिक्षण स्थळी आता तपास केला जाणार आहे. कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयितांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार मंगळूर येथे तपास केल्यास आणखी काही धागेदोरे मिळण्याची आशा एसआयटीला आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपारा येथे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून सोळा पिस्तुली जप्‍त केल्या होत्या. त्यापैकी एक पिस्तूल गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभागी असणार्‍या संशयितांनी प्रशिक्षणासाठी वापरण्यात आल्याचा निष्कर्ष एसआयटीने काढला आहे. बेळगाव तालुक्यातील किणयेच्या जंगलात संशयितांनी प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी झाडावर आणि परिसरात मिळालेल्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्या आणि पुंगळ्या नालासोपारा येथून जप्‍त केलेल्या पिस्तुलाशी जुळत असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील चाचणीवेळी दिसून आले.