होमपेज › Belgaon › बायपाससाठी आज फेरसर्वेक्षण

बायपाससाठी आज फेरसर्वेक्षण

Published On: May 08 2019 1:56AM | Last Updated: May 08 2019 12:37AM
बेळगाव : प्रतिनिधी

हलगा?मच्छे बायपाससाठी मंगळवारीही काम बंद होते. काही शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी कागदपत्रांची पडताळणी करून सर्वे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार दि. 8 रोजी मशीनव्दारे फेरसर्वेक्षणाचा निर्णय झाला.

सोमवारी काही शेतकर्‍यांनी सर्वेक्षणाविरोधात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे धाव घेतल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ज्याठिकाणाहून रस्ता वळवत होते, ते  थांबवून जुन्यात पध्दतीने सर्वेक्षण करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. त्यानुसार शेतकरी आणि प्रांताधिकारी डॉ. कविता योगप्पणावर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षणाची माहिती घेतली. त्यावेळी सर्वेक्षणात अनेक चुका आढळून आल्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे बाचाबाची झाली. पोलिसांनीही दमदाटी केली. पण, जुन्यात जागेवरून सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला.

मंगळवारी रस्ता काम बंद होते. तेथून वाहनेही हटविण्यात आली होती. संध्याकाळी जयराज हलगेकर, गंगाधर बिर्जे, राजू मरवे आणि शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन सर्वेक्षणाची माहिती घेतली. त्यावेळी नव्याने होत असलेला सर्व्हे चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केली आणि बुधवारी यंत्राव्दारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

अलारवाडकडून सर्व्हे?

एकीकडे प्रशासनाने सर्वे थांबवून जुन्या जागेवरुन सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला असला तरी, मंगळवारी काही अधिकार्‍यांनी अलारवाड क्रॉसकडून सर्व्हे केला आहे, असा आरोप काही शेतकर्‍यांनी केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत पुन्हा धास्ती लागून आहे.

नोटीस एकला, जमीन दुसर्‍याची

हलगा?मच्छे बायपाससाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भू?संपादनाबाबत नोटीस बजावली आहे. पण, अनेक ठिकाणी  दुसर्‍याच शेतकर्‍यांची जमीन संपादित केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत संभ्रम वाढला आहे.

शेतकर्‍याला मिळणार नोकरी?

बायपासमध्ये शेती जाणार्‍या एका शेतकर्‍याला सरकारी नोकरी देण्याची ग्वाही प्रांताधिकारी योगप्पणावर यांनी दिली आहे. या शेतकर्‍याची सुमारे दीड एकर जमीन जात आहे. पण, त्याहून अधिक शेती जाणार्‍या शेतकर्‍यांना अशी ग्वाही का दिली नाही, असा सवाल शेतकर्‍यांतून उपस्थित होत आहे.