निपाणी : मधुकर पाटील
जागतिक आरोग्य संघटनेने 2025 पासून तंबाखू उत्पादनावर बंदी घालण्यासाठी हालचाली चालवल्या असताना यंदा निपाणी भागात या पिकाचे क्षेत्र 1 हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. दोन-तीन वषत या पिकाला मिळालेला दर व यंदा तब्बल महिनाभर पाऊस लांबल्याने तंबाखू क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी संशोधन व रयत संपर्क केंद्राने सांगितले.
तंबाखू उत्पादनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी यंदा रयत संपर्क केंद्राकडून हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणाची विक्रमी विक्री केली आहे. सुमारे 6 क्विंटल 925 किलो ताग बियाणाची सबसिडी स्वरूपात विक्री झाली आहे. त्यामुळे तंबाखू क्षेत्रात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निपाणी परिसर हिरवळीचा पट्टा म्हणून कृषी खात्याच्या दप्तरी नोंद आहे. या भागात जिरायत व बागायतीसह माळमुरड जमिनीचे प्रमाणही अधिक आहे. अलिकडे अनेक शेतकर्यांनी बारमाही पाण्याच्या सोयीमुळे नापिक जमीनही सुपीक बनविली आहे. शेतकर्यांनी वर्षागणिक येणार्या उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतुत अनेक प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
यंदा वरूणराजाचे उशिरा आगमन झाल्याने खरीपातील पेरणी कामे लांबणीवर पडली आहेत. अद्यापही 30 टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी तंबाखूसह आडसाली ऊस उत्पादन घेण्याची तयारी चालवली आहे. खरीप हंगामात भुईमूग, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. यंदा उशिरा पेरण्या झाल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे न जाता तंबाखू व ऊस उत्पादनावर शेतकर्यांनी भर दिला आहे.
शेतकर्यांनी तंबाखू पीक क्षेत्रात आडसाली उसाचे उत्पादन घेण्यासाठी सरी आड लागवड अथवा बोदावर तंबाखू लावण करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने रानाची मशागत झाली आहे. तंबाखू पिकाचे उत्पादन घेण्यासाठी रोप निमिर्ती करण्यास तयारी चालवली आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तंबाखू लावणी कामास सुरूवात होते.
येथील रयत संपर्क केंद्राच्या दप्तरी नोंदीनुसार निपाणी भागात 2017 मध्ये 4 हजार, 2018 मध्ये 4500 आणि यंदा 5500 हेक्टरवर तंबाखूचे क्षेत्र असणार आहे. खरिपात झालेल्या अन्य पिकांच्या पेरणीच्या आकडेवाडीनुसार तंबाखू क्षेत्र वाढणार असल्याचा दावा रयत व कृषी संशोधन केंद्राने केला आहे.