Sun, Dec 15, 2019 06:17होमपेज › Belgaon › मराठी भाषा दिन विशेष : वृत्तपत्र वाचनातून ‘मराठी’ संवर्धन

मराठी भाषा दिन विशेष : वृत्तपत्र वाचनातून ‘मराठी’ संवर्धन

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:29PMआपल्या सिध्दहस्त लेखणीने मराठी साहित्याला हिमालयाची उंची देणारे कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. तो मराठी भाषादिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. बेळगाव परिसरात मराठी जतनाचे कार्य निष्ठेने आणि प्राणपणाने केले जात आहे.  विविध ठिकाणी यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातूनच मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि अस्मितादर्शन घडत असते.

बेळगाव  प्रतिनिधी

नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्याची सार्वत्रिक ओरड ऐकू येते. हे चित्र सीमाभागात अधिकच भयावह आहे. नवी पिढी सोशल मीडियाच्या मागे लागली असून आभासी नात्याशी जोडली जात आहे. यामुळे युवकांना पुन्हा वाचनाकडे वळविण्यासाठी महाविद्यालयाना नवे प्रयोग राबवावे लागत आहेत. विशेष म्हणजे याला चांगला प्रतिसाद लाभला, हे कौतुकास्पद आहे.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित बी. के. महाविद्यालय म्हणजे मराठी संवर्धनाचे केंद्र आहे. येथे प्रामुख्याने ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. त्यांना वृत्तपत्र वाचनाची सवय नसते. नेमके हे हेरून येथील मराठी विभागाने 1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान वृत्तपत्र वाचन कार्यक्रम जाहीर केला. मराठी भाषेतील कोणतेही वृत्तपत्र वाचून त्याचा सारांश एका कागदावर लिहून कार्यालयात जमा करायचाण असा हा उपक्रम होता.

यासाठी प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. मराठी विभागप्रमुख डॉ. डी. टी. पाटील, डॉ.  सरोजिनी चौगुले, प्रा. अशोक अलगोंडी यांनी यासाठी पुढाकार घेतला. याला विद्यार्थ्यांतून चांगला प्रतिसाद लाभला. 

वृत्तपत्रे ही समाजाचा आरसा असतात. समाजात घडणार्‍या घडामोडींचे प्रतिबिंब यामध्ये पडत असते. जगाचे भान येते. प्रगतीच्या दिशा कळतात. यासाठी वृत्तपत्र वाचन महत्त्वाचे ठरते. यातून विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडण होते. विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात.

सुरुवातीच्या काळात प्रतिसादाबाबत प्राध्यापकांना साशंकता होती. मात्र तब्बल 125 विद्यार्थ्यांनी यासाठी नावनोंदणी केली. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार वृत्तपत्रे निवडून त्याबाबत रोज लेखन केले. यामुळे नेहमी ओस पडणारे वाचनालय विद्यार्थ्यांनी भरून गेले. प्राध्यापकांना वाचनासाठी वृत्तपत्रे मिळणे अवघड बाब बनली. यामुळे संयोजकांचा उत्साह दुणावला. 

या उपक्रमात सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मराठी भाषा दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागली असून ती भविष्यात अन्य वाचनासाठी उपयोगी ठरणारी आहे. 

मराठी विद्यानिकेतनमध्ये भाषादिनाची लगबग

मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषेची महती सांगणारे फलक घेऊन विद्यार्थ्याकडून तयारी करण्यात आली.

अन्य भाषेतूनही होणार उपक्रम

मराठी विभागातर्फे राबविलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून कन्नड, इंग्रजीतून स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

समाजात घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रामध्ये पडत असते. यामुळे वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक असते. विद्यार्थ्यामध्ये वाचन वाढावे यासाठी सदर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. यातून वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होणार आहे.   - प्रा. अशोक अलगोंडी