Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › आमदारांमध्ये चढाओढ सर्वाधिक मते देण्याची 

आमदारांमध्ये चढाओढ सर्वाधिक मते देण्याची 

Published On: Apr 11 2019 2:00AM | Last Updated: Apr 10 2019 9:29PM
बेळगाव : प्रतिनिधी 

कोठून किती मते मिळाली, याची बूथनिहाय माहिती आता मिळणे सोपे झाले आहे. त्यामुळे कोण कोणासाठी काम केले आणि कोणी अंतर्गत दुसर्‍याच उमेदवाराला मदत केली, हे देखील कळते. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघातील सर्वच आमदार झटकून कामाला लागले आहेत. प्रत्येकामध्ये आपल्या मतदार संघातून आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मते कशी मिळतील? यासाठी धडपड सुरू आहे. 

बेळगाव लोकसभा मतदार संघात 8 विधानसभा मतदार संघ येतात. यापैकी बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, अरभावी, सौंदत्ती यल्लम्मा व रामदूर्ग या पाच मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. आतापर्यंत बेळगाव दक्षिणमधून सातत्याने अंगडींना सर्वाधिक मतदान मिळाले आहे. यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघातूनच सर्वाधिक मतदान भाजपला होण्याचा दावा आमदार अभय पाटील यांनी केला आहे, तर अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आपल्याकडून सर्वाधिक मतदान भाजपला होईल, असे सांगितले आहे. स्वतः मोठ्या फरकाने जिंकून येणारे बेळगाव उत्तरचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनीही भाजपचा जोरदार प्रचार सुरू केला असून, आपणही अधिकाधिक मते देण्याचा दावा केला आहे. सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी आणि रामदूर्गचे महादेवाप्पा यादवाड यांनीही देशासाठी मोदी कसे गरजेचे आहेत, यासाठी भाजपला निवडून द्या, असे आवाहन करत अधिकाधिक मतासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरित खासदार अंगडींकडून सुरू असलेल्या प्रचारात आमदारांचीही भूमिका महत्वाची ठरत आहे. 

काँग्रेसचे आमदार असलेल्या बेळगाव ग्रामीणमध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचाराला प्रारंभ केला आहे. कधी त्या त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तर कधी साधूनवर यांच्या कुटुंबियांसोबत ग्रामीण भागात फिरत आहेत. आपल्याला जसे प्रचंड मताने निवडून दिले तसेच साधूनवर यांना उच्चांकी मते द्या, असे साकडे त्या मतदारांना घालत आहेत.  बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी हे त्यांच्यापरिने प्रयत्न करत आहेत. परंतु, गोकाकचे आमदार आणि माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. त्यांनी अद्याप जाहीररित्या प्रचारात कुठेही सहभाग घेतलेला नाही. त्यांनी तो घ्यावा, यासाठी त्यांचे बंधू वनमंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी अद्यापही प्रयत्नात आहेत. त्यामुळे ते साधूनवर यांचा जाहीर प्रचार करणार का? हे पुढील आठवडाभरात दिसून येणार आहे. 

मोदींसाठी मतयाचना 

खासदार सुरेश अंगडी यांचे भाजपमधील सर्वच आमदारांशी सख्य आहे, असे नाही. परंतु, प्रत्येकाला  हायकमांडनेच लक्ष्य दिले असल्यामुळे प्रचारात सर्व आमदार व अन्य लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग दिसून येत आहे. खासदार अंगडींसाठी मत असले, तरी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुमचे मत महत्वाचे आहे, असा प्रचार भाजपच्या आमदारांसह लोकप्रतिनिधींनी सुरू केला आहे. त्याला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.