Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Belgaon › मृत्यूलाही त्यांनी एकत्रित कवटाळले!

मृत्यूलाही त्यांनी एकत्रित कवटाळले!

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

हसतमुख, आज्ञाधारक, सालस आणि गुणी अशी मुलं होती. प्रत्येक काम मन लावून करत. त्यांची मैत्री होती. ते एकत्र फिरत...अभ्यास करत. शाळेत एकाच बाकावर बसत.  मृत्यूलाही सामोरे जाताना त्यांनी एकत्रितच मृत्यूला कवटाळले आणि अखेरच्या प्रवासाला निघाले....असे सांगताना शिक्षकांचे डोळे पाणावले.  रविवारी खाणीमध्ये बुडून अंत झालेल्या त्या तीन विद्यार्थ्यांच्या आठवणीने  शिक्षक विमनस्क अवस्थेत बोलत होते.

मृत पावलेले साहिल बाळेकुंद्री व आकाश चौगुले हे दोघे गोजगे येथील  हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होते. कुशन कल्लाप्पा चौगुले हा मण्णूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. शिक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरून आल्या होत्या. गोजगे हायस्कूलचे मुख्याध्यापक  एस. व्ही. जाधव म्हणाले, आकाश चौगुले आणि साहिल बाळेकुंद्री हे दोघे मण्णूर येथून गोजगे येथे शिक्षणासाठी येत होते. आकाश चौगुलेचे आजोळ  गोजगा. त्याची आई गोजगा हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. तिने आपल्या मुलाला गोजगा हायस्कूलमध्ये दाखल केले होते. आकाश आणि साहिल हे दोघेही अतिशय प्रामाणिक विद्यार्थी होते. वर्गात प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळखले जात. अभ्यासात हुशार असल्यामुळे अल्पावधीत त्यांनी शिक्षकांची मने जिंकली होती. 

शाळा सुटल्यावर ते कधी कधी आपल्या गाडीवरून मण्णूरपर्यंत येत. त्यांना तिथे सोडून मी पुढे जात असे. काल अचानक दुर्घटना घडली आणि शाळा दु:खसागरात बुडाली, असे सांगताना त्यांचा जाधव यांचा दाटून आला.मण्णूर प्राथमिक शाळा दु:खावेगात आहे. आकाश व साहिल हे दोघे माजी विद्यार्थी होते. तर कुशन चौगुले हा चौथीच्या वर्गात होता. त्याच्या वर्गशिक्षिका एस. आर. हिरोजी म्हणाल्या, कुशन अतिशय सालस विद्यार्थी होता. शाळेत प्रामाणिक म्हणून ओळखला जात असे. अतिशय शांत, संयमी विद्यार्थी होता. घरातले त्याला फार जपत असत. त्याच्या आजीचा त्याच्यावर फार जीव होता. कुशन आजारी असल्यास त्याची आजी दुपारी औषध घेऊन शाळेत यायची. त्याला औषध द्यायची. त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. 

जातानाही एकत्रच !

आकाश आणि साहिल यांची दोस्ती होती. घरे एकाच गल्लीत लागूनच होती. कायम ते एकत्र असत. हायस्कूलमध्ये पहिल्या बाकावर ही जोडी बसायची. एकत्रित अभ्यास करायची. शाळेला जाताना मिळूनच येत. शेवटी त्यांचा मृत्यूही एकत्रच झाला.

त्यांच्या स्मृतीला अभिवादन

मृत विद्यार्थ्यांना मण्णूर सरकारी प्राथमिक शाळा व गोजगे हायस्कूलतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.गोजगे येथे शाळा सुधारणा समिती सदस्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव , खाचू चलवेटकर यांनी श्रद्धांजली वाहिली. अतिशय सालस, प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे शाळेवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे सांगितले. 

लक्ष्मण प्रभावळकर, शिवाजी यळगे, सी. ए. चौगुले, पी. एम. पाटील, यु. एम. जाधव, एस. के. दिवटे, आर. एस. चिक्‍कमठ, ए. बी. बामणे, अरुण कांबळे व  विद्यार्थी उपस्थित होते.मण्णूर प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक उघाडे यांनी त्यांच्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या. ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

Tags :Three,, boys drawn ,Belgaon, news