Thu, Dec 12, 2019 22:39होमपेज › Belgaon › तुमच्या गावात पाणी नाही, मग मुलगीही देणार नाही 

तुमच्या गावात पाणी नाही, मग मुलगीही देणार नाही 

Published On: May 22 2019 1:35AM | Last Updated: May 21 2019 11:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

हुंडा, वाहन व इतर कारणांसाठी विवाह रद्द झाल्याची उदाहरणे आहेत. आता दुष्काळी भागात मुली देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर काही ठिकाणी उपवरांना पाण्याअभावी काही महिने लग्‍न पुढे ढकलण्याचे आवाहन केले जात आहे.तुमच्या गावात पाणी नाही, मग आमची मुलगीही देणार नाही, अशी भूमिका काही मुलींचे पालक घेत आहेत. 

बोरगाव परिसरातील एका गावात तीव्र पाणीटंचाई आहे. तेथील एका उपवराने कोल्हापूर जिल्ह्यातील मुलगी पाहिली. पसंत पडल्यानंतर घर बघायला येण्याचे निमंत्रण मुलाकडील मंडळींनी दिले. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी मुलाचे घर गाठले. त्यावेळी तेथील परिसरात अनेक लोक पिण्याच्या पाणी आणण्यासाठी कसरत करत असल्याच दिसून आले. मुलाच्या घरीही हीच स्थिती होती. हे पाहून मुलीच्या वडिलांनी ‘पाणी नसणार्‍या ठिकाणी संबंध जोडणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.

या गावामध्ये अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाचा तडाखा वाढतच आहे. अशावेळी बोरगाव परिसरातील त्या गावात घरातील महिला, मुले असे सर्वचजण पिण्याचे पाणी साठवण्यात गुंतल्याचे चित्र दररोज दिसून येते. गावाची लोकसंख्या चार हजार इतकी आहे. पण, तेथील पाणीटंचाई दूर करण्याबाबत कोणत्याच अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली नाही की उपायोजनाही केली नाही. सुमारे 1 कि. मी. दूरवरुन लोकांना पाणी आणावे लागत आहे.

राज्यातील 176 तालुक्यांपैकी 156 तालुक्यांत दुष्काळ आहे. त्यामुळे पावसाअभावी बहुतेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. काही गावांत जलस्रोत कोरडे पडले आहेत. काही कि. मी. पर्यंत पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे अशा गावांतील उपवरांना विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच तीव्र दुष्काळी छाया आणि पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे 3,122 गावांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागत आहे. कोलारमध्ये दहा वर्षांपूर्वी कूपनलिकेला 150 फूटांवर पाणी लागत होते. पाच वर्षांपूर्वी 350 फूटांवर पाणी लागत होते. आता 600 फूट खोदाई केली तरी पाणी लागणार याची खात्री नाही. 

अतिवृष्टीच्या ठिकाणीही दुष्काळ

गतवर्षी कोडगू, चिक्‍कमगळूर व किनारपट्टीवर अतिवृष्टी झाली होती. मग, हे पाणी गेले कुठे? असा प्रश्‍न निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते अतिवृष्टी झाल्यानंतर पाण्यामुळे जमिनीची धूप होते. यामुळे पाणी जमिनीत शोषून घेतले जात नाही. ते वाहून जाते आणि अखेरीस समुद्राला मिळते.  

गावाकडे जाणे टाळले

नोकरी, व्यवसायानिमित्त बंगळूरसह मोठ्या शहरांत जाऊन राहिलेल्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात आपल्या गावी जाण्याऐवजी गावातील कुटुंबीयांनाच शहरात बोलावून घेतल्याची काही उदाहरणे आहेत. गावामध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने मुले आजोळी गेली नाहीत. उन्हाळी सुटी त्यांना आपल्याच घरात घालवावी लागली. बेळगाव तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांमध्ये झालेल्या यात्रांनाही यंदा पाणीटंचाईची झळ बसली. टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला तरी ते अपुरे पडले.