Sun, Dec 08, 2019 22:07होमपेज › Belgaon › निवडणुकीचा ‘फील’ आहेच कुठे?

निवडणुकीचा ‘फील’ आहेच कुठे?

Published On: Apr 18 2019 2:02AM | Last Updated: Apr 17 2019 10:24PM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरात कुठे तरी आडबाजूला फिरणार्‍या दहा-बारा रिक्षा, कोणत्या तरी संघ, संस्थेला अथवा नातेवाईकांना छुपी भेट देणारे उमेदवार, ना बॅनर.. ना शक्ती प्रदर्शनाची एखादी रॅली... ना कोपरा सभा.. ना कार्यकर्त्यांची जाहीर बैठक... अशी मरगळ आलेली लोकसभा निवडणूक सध्या अधिक जाणवत आहे. उन्हाची काहिली, खर्चावर निर्बंध किंवा निवडणूक आयोगाची करडी नजर... कारण काहीही असले, तरी निवडणुकीचा फील काही येईना, असे खुद्द उमेदवारांसोबत फिरणार्‍या कार्यकर्त्यांनाच वाटू लागले आहे. 

चार दिवसांपूर्वी आठ-दहा रिक्षाचालक एका उमेदवाराच्या प्रचारासाठी रिक्षा फिरविण्याचे भाडे ठरविण्यासाठी गेले होते. त्यांचे भाडे देतानाही उमेदवाराच्या कॅशिअरकडून मोठी घासाघीस सुरू होती. रिक्षावर बॅनर, ध्वनीक्षेपक याचे भाडे कसे खर्चात धरले जाते, हे त्या रिक्षा चालकांना समजावून सांगण्याचा कॅशिअरचा प्रयत्न. परंतु, तो काही रिक्षा चालकांच्या पचनी पडत नव्हता. तरीही मिळतंय तितकं गोड मानून हे रिक्षा चालक बाहेर पडले. जर रिक्षातून पुकारण्याच्या खर्चासाठी इतकी घासाघीस सुरू असेल, तर इतर बाबींचे पहायलाच नको, अशी स्थिती सध्याची निवडणूक पाहताना दिसून येते.

उमेदवार 57 पण, दिसेना कोणीच

बेळगावच्या आखाड्यात तब्बल 57 उमेदवार रिंगणात आहेत.  मए समितीच्या 45 जणांनी अर्ज भरल्याने राज्यातील सर्वाधिक उमेदवार असलेला मतदार संघ म्हणून म्हणून झोतात आला आहे. परंतु, शहरात अथवा एखाद्या उपनगरांमध्ये जाहीररित्या फिरताना कोणीच दिसत नाही. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोमात होईल, असे वाटत असताना अद्यापही त्यांनी छुप्या प्रचारावरच भर दिला आहे. कोणी तरी राज्यातील नेता आल्यानंतर तेवढीच एखादी  बैलहोंगल, कित्तूरसारख्या ठिकाणी सभा होताना दिसते. अन्यथा बेळगाव शहर, गोकाक परिसरात अद्यापही सामसून दिसून येते. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मए समितीने प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, त्यांचा प्रचारही नातेवाईक आणि ओळखीच्या बाहेर गेलेला नाही. इतर जे अपक्ष अथवा प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत, त्यांचा पत्ता कुठे आहे?  हे त्यांनाच ठाऊक. 

प्रचार कार्यालयेही ओस

इतरांचे राहु द्या, किमान राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची प्रचार कार्यालये गजबजलेली असावीत, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या ठिकाणीही सामसुम दिसून येते. कार्यालयात एखाद् दुसरा समर्थक, एखादा क्‍लार्क आणि सहज  म्हणून भेटायला आलेले चौघे, इतकाच काय तो माहोल दिसून येतो. 

पूर्वीची आठवणी ताज्या 

आताची निवडणूक पाहिली की पंधरा-वीस वर्षांपूर्वी होणार्‍या निवडणुकीची हमखास आठवण आल्याशिवाय राहात नाही. गावो-गावी आणि गल्लोगल्ली कल्ला असायचा. ताई-माई अक्का... अमूक चिन्हावर मारा शिक्का, येऊन येऊन येणार कोण...? .... यांच्याशिवाय आहेच कोण... असे ध्वनिक्षेपकावर दिवसभर ओरडणारे जनतेच्या दुपारच्या वामकुक्षीची पुरती वाट लावायचे. 

लोकसभा असली, तरी खेड्या गावांतही  प्रचार 

कार्यालय असायचे. चार ठिकाणच्या प्रचार कार्यालयांवर आणि विविध गाड्यांवर ध्वनिक्षेपक दिसायचे. परंतु, आज ध्वनिक्षेपक रिक्षांपुरते मर्यादित झाले आहेत.  

प्रचारासाठी आणखी चार दिवस

बघता बघता निवडणूक सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. फील येण्यापूर्वीच मतदानाचा दिवसही उजाडेल. रविवार सायंकाळपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत आहे. या चार दिवसांत जाहीर प्रचार कमी अन् छुपाच अधिक होईल, असे कार्यकर्त्यांना जाणवत आहे.