Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › वरुणराजाच्या लपंडावामुळे बळीराजा संकटात 

वरुणराजाच्या लपंडावामुळे बळीराजा संकटात 

Published On: Jun 16 2019 1:44AM | Last Updated: Jun 15 2019 11:12PM
निपाणी : प्रतिनिधी

सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने परिसरातील शिवार बळीराजाच्या वर्दळीने गजबजून गेला आहे. मात्र पावसाअभावी पेरणी झालेल्या  10 टक्के क्षेत्रावरील बियाणांची नासाडी कीड व मुंग्यांकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

निपाणी परिसरात काही भाग वगळता जमीन काळवट आहे. या भागाला वेदगंगा नदीचे वरदान लाभले आहे.आजही शेतकरीवर्गाकडून पारंपरिक शेती पिकविली जात आहे. यात रब्बी व खरीप हंगामात या भागातील अनेक शेतकर्‍यांनी हुकमी पिके घेऊन आपली प्रगती करून घेतली आहे. रब्बी व खरीप हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचे उत्पादन हे शेतकरीवर्गाकडून घेतले जाते. यात खरीप हंगामात सोयाबीन, भात, भुईमूग, चवळी, मूग, ताग, उडीद या पिकांचे तर रब्बी हंगामात शाळू, गहू, हरभरा, कांदा या पिकासह आडसाली ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाते. 

ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली होती. दरम्यान गेल्या चार एकवर्षापूर्वी यात खंड पडला. वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांना बारमाही पाण्याची सोय झाल्याने शेतकरीवर्गाने शेती पिकविण्याचे धोरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. पाण्याचा आधार चांगला मिळाल्याने शेतीचे तंत्रच बदलले आहे. त्यामुळे आजही काही शेतकर्‍यांनी केळी, विविध जातीची फुले, फळे, ऊस आदीची  भरघोस अशी पिके घेतली आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गाचे चित्र पूर्णत: बदलले आहे. निसर्गच आता गैरहंगामी असल्याने शेतकरीवर्गाला याचा त्रास होत आहे.

यावर्षीच्या खरीपासाठी कृषी खात्यानेही चांगल्या प्रकारच्या बियाणाची शेतकरीवर्गासाठी उपलब्धता करून दिली आहे. त्यानुसार या बियाणाची उचलही शेतकरीवर्गाकडून सुरू आहे. मात्र या बियाणाला निसर्गाची चांगली साथ मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पंधरवडयापासुन पावसाळी वातावरण तयार झाल्याने या भागातील काही शेतकर्‍यांनी पेरणीची कामे   घाईगडबडीने उरकली आहेत. यापूर्वी नदीतील पाण्याच्या आधारे ज्यांनी आगावू पेरणी केली आहे, ते शेतकरीही चिंतेत आहेत.

सध्या पावसाने परीक्षा घेतल्याने शेतकरीवर्ग हताश झाला आहे. यापूर्वी या भागातील अनेक शेतकर्‍यांनी खरिपात सोयाबीनचे एकरी 20 क्विंटल, भुईमूगाचे 19 क्विंटल त्याचबरोबर भात व इतर कडधान्याचेही चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. याशिवाय रब्बी हंगामातही पारंपारिक पिकाचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे कृषी खात्याकडे नोंद आहे. यात अनेक शेतकर्‍यांचे कृषीखात्याकडूनही कौतुक झाले आहे. खरिपातील पिकाच्या जीवावरच पुढील रब्बी हंगामातील पिकाचे उद्दिष्ट शेतकरीवर्गाकडून ठरविले जाते. त्यानुसार रब्बीत कोणते व खरीपात कोणते पीक याचे वेळापत्रक ठरविले जाते. ही पध्दत पारंपारिकतेनुसार सुरू आहे. मात्र आता हे सर्व शेतकरीवर्गाला विसरावे लागत आहे. पूर्वीचा निसर्ग वेगळा व आजचा वेगळा असल्याने शेतकर्‍याला आता सध्याच्या निसर्गाची असणारी साथ पाहून आश्‍चर्य व्यक्‍त करण्याची वेळ आली आहे.

कृषी खात्याने खरीपासाठी सबसिडी स्वरूपात मागविलेल्या सोयाबीन,उडीद,तुर,मूग या बियाणाची 50 टक्के इतकी उचल झाली आहे. 100मि.मि.पाऊस झाल्याशिवाय बियाणाची विक्री करावयाची नव्हती, पण पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे  शेतकरीवर्गाची गैरसोय होऊ नये, यासाठी बियाणाचा पुरवठा सुरू ठेवला आहे.शेतकर्‍यांनी थोडे दिवस थांबून चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरूवात करावी. -बी. एस. यादवाड, सहायक कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्र, निपाणी

सध्या निसर्ग पूर्ण बदलला आहे. यात श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिध्दनाथांनी आजपर्यंतच्या आपल्या भाकणुकीत मेघाची कावड गैरहंगामी असल्याचे सांगून शेतकरीवर्गाला सावध केले आहे. या नक्षत्रातील पाऊस जर लागाला तर तो थांबत नाही. या पावसाची धारही कायम असते. या नक्षत्रात पाऊसच न झाल्याने  मेघाची कावड ही गैरहंगामी ठरली आहे. -मारुती दादू पाटील, प्रगतशील शेतकरी, सौंदलगा