Mon, Jan 20, 2020 09:24होमपेज › Belgaon › पर्यटन विभाग उदासीन, सुविधांचा अभाव

पर्यटन विभाग उदासीन, सुविधांचा अभाव

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 8:25PMबेळगाव : अंजर अथणीकर

रिमझिम पावसाच्या सुरुवातीबरोबच आता बेळगाव जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्रांना भेट देण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये पंधरा पर्यटन आणि तीर्थक्षेत्रेे निश्‍चित करण्यात आली असून, या ठिकाणी आगामी सहा महिन्यात सुमारे बारा लाखाहून अधिक पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. यामध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. मात्र, त्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. पर्यटन विभाग आता टुरिझम विभागाचे हॉटेल उघडण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना यामध्ये लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज भासत आहे. 

जिल्ह्यातील पंधरा तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना एप्रिल आणि मे महिन्यात आठ लाखाहून अधिक पर्यटकांना भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा हंगाम जून ते ऑक्टोबरअखेर आहे. या काळात बारा लाख पर्यटक भेटी देणार आहेत.  आजूबाजूच्या राज्यातील पर्यटक आणि भाविक येतात. यासाठी पर्यटन विभागाने सर्व त्या ठिकाणी 32 पर्यटन मित्रांची नियुक्ती केली आहे. याचे काम पर्यटकांना मार्गदर्शन करणे, माहिती देणे, त्यांना सोयी सुविधा पुरवणे हे आहे. हे सर्व पर्यटकमित्र पर्यटन विभागाने मानधनावर नियुक्त केले आहेत.

कर्नाटकात एकूण 319 पर्यटन क्षेत्रे असून, त्यामधील पंधरा क्षेत्रे बेळगावमध्ये आहेत. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटन ठिकाणीच हॉटेल, लॉजिंगचा, स्वच्छतागृहांचा अभाव आहे. काही ठिकाणी तर पर्यटकांची लूट होत असते.गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी येथील धबधब्यास आणि सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरास भेट देणार्‍यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी अपेक्षित पायाभूत  सुविधा  नाहीत. गोकाकला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन असले तरी एक्स्प्रेस गाड्यांना तेथे थांबाच नाही. पर्यटकांना घटपभा स्थानकावर उतरुन वळसा घालून गोकाक फॉल्सला यावे लागते.

येथील ब्रिटिशकालीन झुलता पूल पाहण्यासाठी दूरवरून देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात. गोडचीनमलकीकडेही जाण्यास वाहनांची सुविधा अपुर्‍या आहेत. सौंदत्ती मंदिरास महाराष्ट्रातून अधिक भाविक येतात. त्यांच्या राहण्याची सोय नाही. घाणीचे सम्राज्य असते. चिंचणी (ता. रायबाग) येथील माय्याक्का यात्रेस महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असताना येथेही नागरी सुविधा नाहीत. यात्रेसाठी जागाही खूपच अपुरी आहे. 

बैलहोंगल तालुक्यातील कित्तूर येथील राणी चन्नम्माचा ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला पार  दुर्लक्षितच झाला आहे. येथे परदेशी पर्यटक येत होते. मात्र सुविधांआभावी आजुबाजुच्या परिसरातून येणार्‍या पर्यटकांची संख्या खूपच रोडावली आहे. येथे राहण्याची कोणतीही सुविधा नाही की विकासासाठी प्रयत्न झाले नाहीत.वर्षाला लाखो पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत असताना त्यांना सुविधा मात्र मिळत नाहीत. याचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. 

पर्यटन विभागाचे प्रयत्न...

जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कर्नाटक स्टेट टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत हॉटेलची उभारणी. यामुळे पर्यटकांना योग्य दरात राहण्याची, खाण्याची सुविधा मिळणार आहे.पर्यटकांसाठी वाहने उपलब्ध करुन देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्या अतर्गंत बेरोजगारांना वाहने घेण्यासाठी तीन लाखापर्यंत अनुदान देण्यात येत आहे.पर्यटकमित्रांची संख्या वाढविणार, पर्यटकांना मार्गदर्शन उपलब्ध करणार.

जिल्ह्यामध्ये येथे पर्यटक येतात....

बैलहोंगल तालुका : कित्तूर येथील राणी चन्नम्मा यांचा किल्ला, सोगल येथे जंगलात असलेले सोमनाथ मंदिर
बेळगाव : कणबर्गीतील डोंगरावरील रामतीर्थ मंदिर, राजहंस गड
गोकाक : गोकाकचा धबधबा, गोडचिनमलकी धबधबा, धुपदाळ
हुक्केरी : घटप्रभा नदी
खानापूर : हलशी येथील पुरातन मंदिर
रामदुर्ग : निडसोशी येथील शबरी मंदिर
सौंदत्ती : रेणुका देवी मंदिर, मलप्रभा धरण