Thu, Dec 12, 2019 22:13होमपेज › Belgaon › एटीएमचा तपशील घेऊन ऑनलाईन फसवणूक : मोबाईलवर संदेश आल्याने सजग

शिक्षिकेच्या खात्यावरील ३२ हजार गायब 

Published On: Apr 06 2019 1:44AM | Last Updated: Apr 07 2019 1:43AM
बेळगाव : प्रतिनिधी

ब्लॉक झालेले एटीएम सुरू करायचे आहे, असे सांगून भामट्याने एका शिक्षिकेच्या खात्यावरील 32 हजार 700 रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. फसलेल्या शिक्षिकेने सायबर क्राईमकडे तक्रार करण्याची तयारी चालविली आहे. 

अनघा दीक्षित या केएलएसमध्ये शिक्षिका असून, त्यांचे गोगटे कॉलेजसमोरील कॉर्पोरेशन बँकेत खाते आहे. गेल्या आठवड्यात सलग चुकीचा पिन (सांकेतिक क्रमांक) दाबल्याने त्यांचे एटीएम ब्लॉक झाले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एटीएम सुरू करण्यासाठी अर्ज दिला होता. 

शुक्रवारी सकाळी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. कॉर्पोरेशन बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम ब्लॉक झालेले असून, ते काढण्यासाठी एटीएमवरील नंबर सांगा असे म्हणत आधी संबंधिताने एटीएम कार्डवरील 16 डिजिटलचा क्रमांक घेतला. यानंतर त्याने ब्लॉक काढण्यासाठी पासवर्डदेखील लागतो, असे म्हणत तो देखील मागून घेतला.

लाखावर रक्कम

दीक्षित यांच्या खात्यावर लाखावर रक्कम होती. परंतु, त्यांना मेसेज आल्यामुळे त्या सजग झाल्या व बँकेत जाऊन तातडीने खाते ब्लॉक केल्याने उर्वरित रक्कम राहिली. बँकेतून दिवसाला 25 ते 40 हजारांपर्यंतच रक्कम काढता येते. कदाचित, यामुळेच भामट्याला उर्वरित रक्कम काढता न आल्याने ती वाचल्याचे सांगण्यात येते.

मेसेज येताच सजग

संबंधित भामट्याने एकदा नव्हे तर तीनदा त्यांचा पासवर्ड विचारत त्यांना बोलण्यात मग्न केले. फोन सुरू असतानाच अनघा यांना मेसेज आला. तो मेसेज खात्यावरील अमुक इतकी रक्कम डेबीट पडल्याचा होता. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने फोन कट करून बँक गाठली. तोपर्यंत भामट्याने खात्यावरील 32 हजार 700 रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून घेतली होती.