Mon, Dec 09, 2019 10:57होमपेज › Belgaon › बेळगाव : दुष्काळाला धार, कामगारांना रोहयोचा आधार

बेळगाव : दुष्काळाला धार, कामगारांना रोहयोचा आधार

Published On: May 31 2019 1:53AM | Last Updated: May 30 2019 8:27PM
बेळगाव : शिवाजी शिंदे

जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने नागरिकांना रोजगाराचा प्रश्‍न भेडसावत आहे. यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद लाभत असून मे महिन्याच्या 30 पर्यंत 18लाख 42 हजार मानवदिन काम झाले आहे. यामध्ये बेळगाव तालुका आघाडीवर आहे.दुष्काळी परिस्थितीमध्ये रोजगार हमी योजना लाभदायक ठरली आहे. यामुळे गावागावांतून चांगला प्रतिसाद लाभत असून बेळगाव तालुक्यात मे महिन्यात 118 टक्के काम झाले आहे. त्याखालोखाल बैलहोंगल तालुक्यात प्रतिसाद लाभला आहे.

राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यासाठी 2019-20 वर्षाकरिता 1 कोटी 35 लाख मानवदिनाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत 13.60 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. रोहयोच्या कामामध्ये निश्‍चित अशी मजुरी मिळते. यामुळे नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभत आहे. मेमध्ये जिल्ह्यात 76 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.

रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने तलाव खोदाई, नाला खोदाई, शाळा संरक्षक भिंत आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. बेळगाव, बैलहोंगल, हुक्केरी, खानापूर तालुक्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. तर सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यात सर्वात कमी प्रतिसाद मिळत आहे. या तालुक्यात अधिक प्रमाणात दुष्काळ असला तरी अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून मिळेनासा झाला आहे.

नाला खोदाईला प्राधान्य

जिल्ह्यातील तलावाची कामे पहिल्या टप्प्यात संपली आहेत. यामुळे नाला खोदाईला प्राधान्य दिले आहेत. शिवारातून बहुतांश नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. यामुळे नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे टाळण्यासाठी रोहयोच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे शक्य होणार आहे. दुष्काळापासून होरपळणार्‍या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

तालुक्यात अधिक प्रतिसाद

बेळगाव तालुक्यात अधिक प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. ता. पं. ने चांगल्या प्रकारे जागृती केल्याने दिवसेंदिवस नागरिकांचा रोहयो कामावर उपस्थिती वाढत आहे. बेळगाव तालुक्याला वार्षिक 11 लाख 5 हजार मानवदिनाचे उद्दिष्ट आहे. यापैकी मे महिन्यात 2 लाख 35 हजार मानवदिन काम करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक काम बेळगाव तालुक्यात झाले आहे.