Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › ‘रोहयो’च्या समस्यांवर निघणार तोडगा

‘रोहयो’च्या समस्यांवर निघणार तोडगा

Published On: Jun 15 2019 1:44AM | Last Updated: Jun 14 2019 8:54PM
बेळगाव  : प्रतिनिधी

रोजगार हमी योजनेतील कामगारांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी कामगार आणि ग्रा. पं. अधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक सोमवार (दि. 17)  सकाळी 11 वा. आयोजित केली आहे. यामध्ये रोहयोबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

बेळगाव तालुक्यात रोहयोची कामे सर्वाधिक सुरू आहेत. परंतु काही ग्रा. पं. कडून कामगारांना योग्य प्रकारे वागणूक देण्यात येत नाही. फसवणूक करण्याचा प्रयत्न होतो.हे टाळण्यासाठी बैठक घेण्याची मागणी ग्रामीण कुलिकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. याची दखल घेऊन बैठकीचे आयोजन केले आहे. 

तालुक्यातील 59 ग्रा. पं. कार्यक्षेत्रात रोहयोची कामे सुरू असून 15 हजारहून अधिक कामगार कार्यरत आहेत. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू केली आहे. परंतु अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे अडचणी  निर्माण झाल्या आहेत. याबाबत जि. पं. व ता. पं. कडे वारंवार तक्रार करण्यात आल्या होत्या. ग्रा. पं. अधिकारी कामगारांना काम देण्याचे टाळतात. कामगारांचे वेतन अदा केले जात नाही. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात येत नाही, कायकबंधूचे वेतन रोखण्यात आले आहे. याबाबत चर्चेची मागणी केली होती. 

कामगारांच्या तक्रारी

* कामगारांच्या मागणीनुसार कामाचा पुरवठा केला जात नाही.
* प्राथमिक उपचार, सावली, पाण्याची व्यवस्थेकडे दुर्लक्ष
* कायकबंधूकडे एनएमआर देण्यास टाळाटाळ
* एनएमआरमध्ये कामगारांची नावे नोंदविण्याकडे दुर्लक्ष
* वयस्कर कामगारांना कामांमध्ये सवलत देण्यास नकार
* काम देण्यास टाळाटाळ
* कॉम्युटर ऑपरेटर, पंचायत कामगारांकडून रोहयो कामगारांची अडवणूक
* कायकबंधूना तीन रुपये देण्यास नकार
* कमी वेतन देण्याचा प्रयत्न.

रोहयो कामगारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी ग्रा. पं. पीडीओंच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी जि. पं. कडे केली होती. याची दखल घेऊन बैठकीचे आयोजन केले आहे.
-व्ही. एस. हिरेमठ
ग्रा.कु.सं. कार्यकर्ता.