Sun, Dec 08, 2019 21:44होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नाचे ठराव न्यायालयीन लढ्याला पूरक

सीमाप्रश्‍नाचे ठराव न्यायालयीन लढ्याला पूरक

Published On: Dec 01 2018 1:04AM | Last Updated: Nov 30 2018 8:33PMबेळगाव : शिवाजी शिंदे

सीमाभागात होणारी संमेलने ही साहित्याचा उत्सव नसतो, तर मराठीचा जागर असतो. संमेलनातून मराठी भाषा, संस्कृती, लिपी यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होतो. संमेलनामध्ये पारित करण्यात येणारे ठराव मराठीच्या लढ्यासाठी पूरक ठरतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा ठराव न्यायालयीन कामकाजात लोकेच्छा दर्शविणारा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.

संमेलने ही मराठीच्या चळवळीला पूरक वातावरण तयार करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आली. यातून भाषा, लिपी, संस्कृतीचा जागर सुरू करण्यात आला. परिणामी मराठी भाषिकांची इच्छा दर्शविणारे ठराव यामध्ये करण्यात येतात.

संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव बेळगाव येथे 1946 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची चळवळ गतिमान करण्यात आली. यातून सीमाभागाविना संयुक्त महाराष्ट्र साकारले.

सीमालढ्याचे अभ्यासक  य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली 2000 मध्ये झालेल्या अ. भा.  मराठी साहित्य संमेलनात सीमाप्रश्‍न न्यायालयात नेण्याची सूचना करण्यात  आली. त्यानुसार 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राने धाव घेतली. 

न्यायालयीन कामकाजामध्ये संमेलनामध्ये पारित केलेले सीमाप्रश्‍नाचे ठराव पुरावा म्हणून सादर केले आहेत. परिणामी संमेलनांत मांडण्यात येणार्‍या ठरावांना महत्त्व आहे.

प्रशासनाने  ठरावांचा धसका घेतला आहे. ठराव मांडण्यास प्रतिबंध होत आहे. सांबरा साहित्य संमेलनात  सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडणार्‍या दिलीप चव्हाण यांचे वेतन अडवून ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याने केला होता. काही संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी देण्यात आली होती. संमेलनामध्ये पोलिस  तैनात करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतात.

प्रशासनाचे हे कुटिल डाव उधळत सर्वच संमेलनात सीमाप्रश्‍न ठराव टाळ्यांचा गजरात संमत होत आहेत. यातून लढ्याला बळ मिळत आहे.

सीमाभागात होणारी संमेलने मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मांडण्यात येणार्‍या संमेलनांना महत्त्व आहे. संयोजकांनी सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडताना लढ्याला पूरक ठरेल याप्रकारे मांडून घेणे आवश्यक आहे.     - अ‍ॅड. सुधीर चव्हाण