Mon, Dec 09, 2019 11:23होमपेज › Belgaon › कानडीकरणाचा पुन्हा फतवा

कानडीकरणाचा पुन्हा फतवा

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 12:36AM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर नियमानुसार कन्नडमध्ये फलक लावणे आवश्यक असून सर्व दुकानांना नोटीस बजावा. ज्यांनी दुकानांवर कन्नड फलक लावला नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरात कानडीकरणाचा पुन्हा फतवा काढण्यात आला.
कोणत्याही सरकारी कार्यालयात कन्नडच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये. दुकाने व इतर इमारतींवर जाहिरात फलक हे नियमानुसार निर्धारित कन्नड फलक असले पाहिजेत. त्यामुळे कन्नड फलकांबाबत दुकानदारांना नोटीस देऊन तत्काळ पुढील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा आदेश डॉ. बोम्मनहळ्ळी यांनी दिला.

बँकांतही कानडीकरण

बँकेचे व्यवहार कन्नडमध्येच होणे आवश्यक आहेत. बँकेचे करारपत्रसुध्दा कन्नडमध्ये आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात यावी. पावत्या, प्रमाणपत्र कन्नडमध्ये असाव्यात, यासाठी बँकांना सूचना करण्यात यावी. एका महिन्यात बँकांंत कानडीकरण होणे आवश्यक आहे. शिक्षण खाते, सहकार खात्यानेही कन्नडचा अवलंब करावा, असेही डॉ. बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले.

मराठीवर कारवाई करा

चिक्कोडी विभागातील काही नगरपालिका, नगर परिषदांत मराठी भाषेत फलक लावण्यात आले आहेत. ते तत्काळ काढावेत. त्याठिकाणी कन्नडमध्येच फलक लावण्यात यावेत, कन्नड फलक आणि भाषेच्या वापरासाठी महिनाभरात अधिकार्‍यांची एक बैठक घ्यावी आणि त्यांना सक्तीने कन्नडचा अंमल करण्यास सांगावे, असे आदेश डॉ. बोम्मनहळ्ळी यांनी चिक्कोडी प्रांताधिकार्‍यांना दिले.

ज्ञानपीठ विजेत्यांचे फोटो लावा

जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांत कन्नडमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे फोटो लावण्यात यावेत. ज्या शाळांत कन्नड विषयांचे शिक्षक नाहीत, त्याठिकाणी तत्काळ नियुक्ती करावी, असा आदेशही बोम्मनहळ्ळी यांनी बजावला.

निवासी जिल्हाधिकारी डॉ. एच. बी. बुद्देप्पा, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी डॉ. कविता योगप्पनवर, शिवानंद बजंत्री, रवि सोमलिंगण्णवर यांच्यासह माजी महापौर सिद्धनगौडा पाटील, अनंतकुमार ब्याकुड यांच्यासह कन्नड संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एफआरआयही कन्नडमध्येच

पोलिस खात्याकडूनही कन्नडच्या अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे प्रयत्न करण्यात येतात. न्यायालयात सादर करण्यात येणारा एफआरआय आणि दोषारोप पत्रही कन्नडमध्येच असते, अशी माहिती पोलिस आयुक्त लोकेश कुमार यांनी बैठकीत दिली.