Thu, Dec 05, 2019 21:03होमपेज › Belgaon › सतीश इन, रमेश आऊट ?

सतीश इन, रमेश आऊट ?

Published On: Dec 22 2018 1:37AM | Last Updated: Dec 22 2018 1:37AM
नवी दिल्ली, बंगळूर : प्रतिनिधी

बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होणार असून रमेश जारकीहोळींना डच्चू, तर त्यांचे बंधू सतीश जारकीहोळींना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नवी दिल्‍लीतील निवासात शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक झाली. बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. 

रमेश जारकीहोळींना वगळून त्यांचे बंधू सतीश यांना मंत्रिपद देण्याविषयीही चर्चा करण्यात आली. मात्र, अंतिम निर्णय बंगळुरातच जाहीर होणार आहे. गेल्या जूनमध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासूनच सतीश जारकीहोळी नाराज आहेत, तर पालिका प्रशासन हे कमी महत्त्वाचे खाते दिल्यामुळे रमेश जारकीहोळीही नाराज आहेत. त्यामुळे रमेश हे गेले काही दिवस भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. त्यामुळेच रमेशना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सतीशना मंत्रिपद मिळेल. गेल्या मंत्रिमंडळातही सतीश मंत्री होते, तर शेवटच्या टप्प्यात रमेशना मंत्रिपद देण्यात आले होते. दिल्लीतील बैठकीत जातनिहाय समीकरणांनुसार लिंगायत, धनगर, मुस्लिम, अनुसूचित जमातीला प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव, उपाध्यक्ष ईश्‍वर खंड्रे, समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या, मंत्री डी. के. शिवकुमार बैठकीत उपस्थित होते. 

मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याच्या सहा जागा रिक्‍त आहेत. लिंगायत समाजातील नेते एम. बी. पाटील, बी. सी. पाटील, धनगर समाजातील नेते एमटीबी नटराज व शिवळ्ळी यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. विद्यमान मंत्री शंकर यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवळ्ळी यांचे स्थान निश्‍चित असल्याचे मानले जाते. मुस्लीम समाजातून रहिम खान यांचे निश्‍चित झाले आहे. अनुसूचित जमातीतून इ. तुकाराम आणि रघूमूर्ती यांची नावे चर्चेत आहेत. लमाणी समाजातील आमदार भीमानायक, उमेश जाधव यांना मंत्रिपदाचा विषय चर्चेला आला.

भोजनावरून नोटीस?

भाजपचे विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला रमेश जारकीहोळी उपस्थित राहिले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्यांनी त्यांना नोटीस बजावल्याचे समजते.