बेळगाव : प्रतिनिधी
ईदएमिलादनिमित्त शनिवारी शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही नगरसेवकांनी पाकिस्तानी राष्ट्रगीतावर नृत्य केल्याचा खळबळजनक आरोप भाजप शहर युवा सचिव राजीव टोप्पण्णावर यांनी केला. मात्र, काही वेळातच पोलिस उपायुक्त अरमनाथ रेड्डी यांनी, ती चित्रफीत दोन वर्षांपूर्वीची असल्याचा खुलासा करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्या जुन्या चित्रफितीमुळे शहरात काही काळ वादंगाचे वातावरण निर्माण झाले.
राजीव टोपण्णावर यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ईदच्या मिरवणुकीत मुस्लीम नगरसेवकांनी पाकिस्तान राष्ट्रगीतावर नृत्य केल्याचा आरोप केला. तसेच उपस्थित पत्रकारांना त्या संदर्भाती चित्रफीतही दाखविली.
त्यामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वृत्तवाहिन्यांनी ती चित्रफित प्रसारित केल्यामुळे शहरात वादंग निर्माण झाला. याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी, शहरात ईद सण शांततेत साजरा होत असताना जुनी चित्रफित प्रसारित करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जुन्या चित्रफितीतून शहरात अशांतता माजविणार्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही रेड्डी यांनी दिला. मात्र, त्या जुन्या चित्रफितीमुळे शहरात काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.