Sun, Dec 08, 2019 21:46होमपेज › Belgaon › ‘निजद’शी केलेली आघाडी  मोठी चूक

‘निजद’शी केलेली आघाडी  मोठी चूक

Published On: Jun 23 2019 1:13AM | Last Updated: Jun 22 2019 11:09PM
बंगळूर : वृत्तसंस्था

कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी निधर्मी जनता दलाशी (निजद) केलेली आघाडी काँग्रेसची फार मोठी चूक ठरली, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री विराप्पा मोईली यांनी शनिवारी पत्रकारांसमोर दिले.

बंगळूरपासून 60 किलोमीटर  अंतरावर असलेल्या चिक्‍कबळ्ळापूर येथे मोईली  एका कार्यक्रमासाठी आले होते. ते म्हणाले, काँग्रेस-निजद आघाडीवर पूर्णपणे आम्ही विश्‍वास ठेवला, ही फार मोठी चूक ठरली. आघाडीशिवाय काँग्रेस लोकसभा निवडणुकीत उतरली असती तर 28 पैकी काँग्रेसला  निश्‍चितपणे 15 ते 16 जागी विजय मिळाला असता. निवडणूकपूर्व या आघाडीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाच प्रचंड विरोध होता; पण त्याकडे नेतेमंडळींनी दुर्लक्ष केल्याचा फटका निकालानंतर दिसून आला.चिक्‍कबळ्ळापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केले; पण मित्रपक्ष असलेल्या निजदच्या कार्यकर्त्यानी धोका दिला, असा आरोपही मोईली यांनी केला.

माझ्यासह काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी आघाडीधर्माचे तंतोतंत पालन केले. पण निजदच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये मदत केली नाही. माझ्या पराभवाला निजदच जबाबदार असल्याचा घणाघातही मोईली यांनी केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी यापुढे नाराज न होता पक्षवाढीसाठी काम करावे, असे आवाहन करून मोईली म्हणाले, चिक्कबळ्ळापुर मतदारसंघातील जनतेने कोणतीही काळजी करू नये. मी आणि काँग्रेस पक्ष या मतदारसंघात अविरत काम करणार. पुढील लोकसभा निवडणुक मी लढविणार का,याची मला माहिती नाही,असेही मोईली यांनी स्पष्ट केले.