Thu, Dec 05, 2019 20:55होमपेज › Belgaon › अन् एसीएफ अवतरले वाघाचा मुखवटा घालून !

अन् एसीएफ अवतरले वाघाचा मुखवटा घालून !

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:24AMखानापूर : वासुदेव चौगुले

विद्यार्थी आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी भरगच्च भरलेले सभागृह. वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी जमलेले पर्यावरणप्रेमी आणि व्यासपीठावरुन वाघाचे महत्व याविषयी वक्त्यांचे सुरु असलेले भाषण ऐकण्यात सर्वजण दंग असताना अचानक वाघाचा मुखवटा धारण करुन एकजण व्यासपीठावर वाघाच्याच ऐटदार रुबाबात एंट्री करतो. 

काही क्षणांसाठी सर्व सभागृह स्थब्ध होते. थोड्या वेळानंतर कळते की सदर व्यक्ती दुसरे कोण नसून दस्तुरखुद्द वनाधिकारीच आहेत. तेंव्हा या अनोख्या पण दिमाखदार वाघाच्या एंट्रीला सर्वचजण दिलाखुलास दाद देतात.

हा प्रकार नुकताच केएलई महाविद्यालयाच्या सभागृहात अनुभवयास मिळाला. प्रसंग होता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तच्या कार्यक्रमाचा. वनखाते आणि केएलई महाविद्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हा वनाधिकारी एम. व्ही. अमरनाथ यांच्यासह आ. डॉ. अंजली निंबाळकर, प्रशिक्षणार्थी आयएफएस अधिकारी आशिष रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या या पंगतीत खानापूरचे उपवनसंरक्षणाधिकारी सी. बी. पाटील यांची गैरहजेरी मात्र कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच जाणवत होती. आगत-स्वागताचा कार्यक्रम होऊन अर्धा तास लोटल्यानंतर एका वक्त्याचे भाषण सुरु असताना अचानक वाघाचा मुखवटा व पट्टेरी रंगाचा वेष परिधान करुन एकजण गुरगुरतच सभागृहात आला. अनपेक्षितणे झालेल्या वाघोबांच्या आगमनाने सारेचजण गांगरले.
मी वाघ आहे. जंगल माझे घर आहे. तिथे तुम्ही अतिक्रमण कराल तर मी तुमच्या घरी येऊन वास्तव्य केले तर चालेल का? असा भावनिक प्रश्‍न उपस्थित करुन त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र मुखवट्यामागची व्यक्ती कोण? याबाबत सार्‍यांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेरीस मुखवटा काढल्यानंतर ते दुसरे कोणी नसून खानापूरचे एसीएफ सी. बी. पाटील असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांमधील कुतूहल चाळण्यासाठी आणि कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढविली. हे करत असताना त्यांनी आपल्या खात्यातील कर्मचार्‍यांनाही पुसटशी कल्पना दिली नाही. घराकडूनच वाघाच्या वेषात तयार होऊन कार्यक्रमस्थळी त्यांची स्वारी दाखल झाल्याने सर्वांसाठी हा सुखद आणि थ्रीलची अनुभुती देणारा क्षण ठरला. पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या प्राणीप्रेमाबद्दल उपस्थितांनी कौतूक करुन सेवावृत्तीची चूणूक दाखविणारे असे अधिकारीही असतात. हे पाहून विध्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटोसाठी गर्दी केली हे वेगळे सांगायला नको.