Sun, Dec 08, 2019 21:44होमपेज › Belgaon › आणखी दहा जण राजीनामा देणार!

आणखी दहा जण राजीनामा देणार!

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 07 2019 1:29AM
बंगळूर : प्रतिनिधी

तेरा आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला असून आणखीन 10 आमदार राजीनामा देणार आहेत, असे काँग्रेसचे बी. सी. पाटील यांनी सांगितले. भीमा नायक, सुब्बा रेड्डी, बसवराज दडदल,  श्रीमंत पाटील, बी. नागेंद्र, गणेश आदी राजीनामे देणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.

राज्यपालांची भेट

काँग्रेस-निजदच्या आमदारांनी सभापतींकडे राजीनामे दिल्यानंतर राजभवनात राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. राजीनाम्यावरून दिवसभर राजकीय नाट्य रंगले. दुपारी 12.30 वाजता आठ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभेत गेले; पण सभापती रमेश कुमार उपस्थित नसल्यामुळे 2.15 वाजेपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली. सभापती येत नसल्यामुळे आमदारांनी सभापतींच्या स्वीय सहायकांकडे राजीनामे दिले. राजीनामे देण्यासाठी आलेल्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार हे विधानसभेत दाखल झाले. पण, आमदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. विश्‍वनाथ, नारायण गौडा, रमेश जारकीहोळी, शिवराम हेब्बार यांनी तेथून काढता पाय घेत सभापती रमेश कुमार यांच्या कक्षाकडे निघाले. शिवकुमार यांनी सभापतींच्या कक्षात जाऊन काँग्रेस आमदारांना राजीनामा देऊ नका, अशी मनधरणी सुरू केली. पण, त्यांना कोणीही दाद दिली नाही.

राजीनामा फाडून टाकला

मंत्री शिवकुमार यांनी मनधरणी करत असतानाही आमदार दाद देत नसल्यामुळे रागाच्या भरात त्यांनी मुनिरत्न यांच्या राजीनाम्याचे पत्र काढून घेऊन फाडून टाकले. त्यामुळे आठ आमदारांनी पहिल्यांदा रमेश कुमार यांच्या स्वीय सहाय्यक विशालक्ष्मी यांच्याकडे राजीनामा पत्र दिले.  त्यानंतर एन. टी. सोमशेखर, बैरती बसवराज, रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा पत्र दिले. मंत्री शिवकुमार यांच्यामुळे मुनिरत्न आणि काही आमदारांना राजीनामा पत्र देता आले नाही. शिवकुमार यांच्याकडून अन्य आमदारांची मनधरणी सुरू होती.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करा : निजद

आमदारकीचा राजीनामा देण्यास जाणार्‍या कोणालाही अडवू नका, त्यांच्या धमकीला घाबरू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन निजदचे प्रवक्‍ते वाय.एस.आर. दत्ता यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले. राजीमाना देणार म्हणून पक्षांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. सरकारला अडचणीत आणून हे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत. मतदारांना यांचे राजकारण चांगलेच माहिती झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

अकरा की तेरा?

काँग्रेस आणि निजद बंडखोर 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे, असा दावा एच. विश्‍वनाथ यांनी केला आहे. पण, सभापती रमेश कुमार यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाकडे 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत, असे सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी एकूण किती आमदारांनी राजीनामे दिले, याबाबत जनतेमध्ये चर्चा होती.

मला कोणीही मोठे नाही : सभापती

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने माझी एकमताने सभापतीपदी निवड केली आहे. मला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता कोणी मोठे नाही. घटनात्मक तरतुदीनुसारच मी काम करणार आहे. मला कोणीही जवळचे नाही. दोन ते तीन लाख लोकांनी आमदार म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर होणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदारांच्या राजीनामाप्रश्‍नी कायद्यानुसार कार्यवाही होईल , असे सभापती रमेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.