बेळगाव : प्रतिनिधी
बंगळूरमध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक करून बेळगावमधील जाधवनगर येथे वास्तव्यास असलेल्या भामट्याला बंगळूर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. शिवप्रसाद असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात बंगळूर येथील बागलकुंटे पोलिस स्थानकात तक्रार दाखल आहे. बंगळूर पोलिसांनी ही कारवाई केली. त्या कारवाईचा स्थानिक पोलिसांना थांगपत्ताही नव्हता.
बंगळूरमध्ये 8 जणांची 10 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांनी शिवप्रसाद नामक व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरून बंगळूर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा शोध सुरू केला होता.
एपीमएमसी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्या जाधवनगर येथे एका प्रतिष्ठित अपार्टमेंटमध्ये शिवप्रसाद वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे गेल्या दोन दिवसांपासून बंगळूर पोलिसांनी जाधवनगर परिसरात जाळे टाकले होते. सोमवारी त्याचा नेमका पत्ता कळताच संबंधित अपार्टमेंटमध्ये लपून बसलेल्या शिवप्रसादला अटक करण्यात बंगळूर पोलिसांना यश आले.
यापूर्वीही बेळगाव वारी
शिवप्रसादचा शोध घेत बंगळूर पोलिस याआधीही एकदा बेळगावात दाखल झाले होते. मात्र, त्यावेळी त्याचा पत्ता लागला नव्हता. आता त्याचा मोबाईल नंबर ‘मोबाईल ट्रॅकर’वर टाकल्यानंतर त्याचा पत्ता लागला आणि त्याला अटक करण्यात बंगळूर पोलिस यशस्वी ठरले. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती. ही घटना जाधवनगर पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येते. मात्र, बंगळूर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे एपीएमसी पोलिस स्थानकाचे सीपीआर जे. एम. कालेमिर्ची यांनी सांगितले. मात्र तशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव रडारवर
आधी गौरी लंकेश हत्या प्रकरण आणि आता 10 कोटींच्या फसवणुकीवरून बेळगाव शहर कर्नाटकाच्या गुन्हेगारी जगताच्या नकाशावर पुन्हा आले आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात मारेकरी असलेला विजापूरचा परशुराम वाघमारे याने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण जांबोटीच्या जंगला घेतले. तो बेळगावात सुमारे 20 दिवस वास्तव्यास होता. त्याला ढाबाचालक असलेल्या बेळगावच्या भरत कुरणे या युवकाने मदत केल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. त्यावरून भरत कुरणेलाही अटक झाली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांत बेळगावचे नाव पुन्हा गुन्हेगारी जगतात चर्चेत आहे.