Sat, Dec 14, 2019 06:18होमपेज › Belgaon › पीओपी नको, शाडूच्या मूर्तींचीच विक्री करा

पीओपी नको, शाडूच्या मूर्तींचीच विक्री करा

Published On: Jul 10 2019 1:37AM | Last Updated: Jul 09 2019 11:47PM
निपाणी : प्रतिनिधी

कोणत्याही परिस्थितीत निपाणी भागात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होऊ देणार नाही.  तरीही अशा मूर्तींची विक्री झाल्यास कारवाई करून दंड आकारणी केली जाईल. मूर्तिकारांनी कायद्याचे पालन करून शाडूची किंवा मातीची मूर्तीची विक्री करावी, असे आवाहन तहसीलदार महादेव बनसी यांनी केले. 

पालिका सभागृहात आयोजित मूर्तिकारांच्या बैठकीत  ते बोलत होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश म्हणाले, जुलै 2016 मध्ये राज्य शासनाने पीओपी मूर्तीवर बंदी आणली आहे.  पण, त्याची सक्तीने अंमलबजावणी झाली नाही. मूर्तिकारांनी या विरोधात न्यायालयात दाखल केलेले अर्ज फेटाळून लावले आहेत. पीओपी मूर्ती व त्यावरील रासायनिक रंगांमुळे पाण्याचे प्रदूषण होते.  मानवासह जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. मूर्तिकारांनी कायदा समजावून घेत सहकार्य करावे. अन्यथा मूर्ती जप्त करुन दंडात्मक कारवाई होईल.

रोटरीचे सुनील पाटील  व नेचर क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. राहुल देसाई यांनी पीओपी 100 टक्के बंद झाल्यावर मूर्तिकारांच्या शाडू व मातीच्या मूर्तीला भाव मिळणार असून याबाबत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. अशोक साळवी, कृष्णा कुुंभार, प्रसाद कुुंभार, शिवाजी कुंभार, हिंदुराव कुंभार यांनी शाडू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिवाय कोणते रंग वापरणे योग्य ठरेल, याबाबत विचारणा केली. 

फौजदार एच. डी. मुल्ला व सीपीआय संतोष सत्यनायक यांनी निपाणी परिसरातील 200 मंडळांना यंदा पीओपी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास प्रतिबंध केला जाईल, असे सांगितले. डॉल्बीप्रमाणे पीओपी मूर्तीवर बंदीची कठोर अंमलबजावणी करू, असे सांगितले.

आरोग्याधिकारी स्वानंद तोडकर यांनी स्वागत केले. बैठकीला पालिका आयुक्त दीपक हरदी, सीपीआय संतोष सत्यनायक, नदाफ, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा पूजा पाटील, नगरसेवक संतोष सांगावकर यांच्यासह मूर्तिकार उपस्थित होते.