Tue, Dec 10, 2019 13:43होमपेज › Belgaon › देशी पिस्तूलसह तलवारी जप्त

देशी पिस्तूलसह तलवारी जप्त

Published On: Dec 06 2018 1:35AM | Last Updated: Dec 06 2018 1:35AM
बेळगाव : प्रतिनिधी

देशी पिस्तूल जवळ बाळगून दादागिरी करणार्‍या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला शहापूर पोलिसांनी जेरबंद केले. एकाकडे देशी पिस्तूल, दोघांकडे तलवारी तर एकाकडे क्रिकेटची टोकदार स्टंप होती. हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

संशयितांमध्ये संदीप ऊर्फ सँडी प्रकाश जाधव  (वय 31, भारतनगर, शहापूर दुसरा क्रॉस), दर्शन पाटील (23, भारतनगर, सहावा क्रॉस), मारुती बी. (23,  मुतगा), महादेव तुळजाई (21, विठ्ठलाई गल्ली, अवचारहट्टी), महेश  मेलगे (21, अवचारहट्टी) व रवी पाटील (28, येळ्ळूर रोड, वडगाव) यांचा समावेश आहे. हे सहा जण शहापूर स्मशानभूमी परिसरात फिरत होते. येणार्‍या-जाणार्‍यांशी भांडण काढत दादागिरी करीत होते, त्यांना लुटण्याचा प्रयत्न  करत होते. शहापूरचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांना ही माहिती मिळताच त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता संदीप ऊर्फ सँडी याच्याकडे देशी पिस्तूल सापडले. महेश मेलगे व रवी पाटील  या दोघांकडे दोन तलवारी सापडल्या तर दर्शन पाटीलकडे क्रिकेटचा स्टंप आढळला. 

डीसीपी सीमा लाटकर, डीसीपी महानिंग नंदगावी, गुन्हे विभागाचे एसीपी महांतेश्‍वर जिद्दी यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद मुशापुरी, सीसीआयबीचे निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, उपनिरीक्षक बी. के. नदाफ, सहायक उपनिरीक्षक उदय पाटील, एस. एल. देशनूर, पोलिस ईश्‍वर बडिगेर, सुरेश कांबळे, व्ही. पी. बूदनवर, एस. आर. दोड्डनायकर, सीसीआयबीचे पोलिस पी. ए. मुत्नाळ, एस. सी. कोरे, आर. एस. नायकवडी, बी. एन. बळगण्णवर आदींनी ही कारवाई केली. दोन महिन्यांपासून पोलिस युवकांना पकडून त्यांच्यावर दरोड्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करत आहेत. शहरात दरोडेखोरांची टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आतापर्यंत किमान आठ घटनांमध्ये अटकेतील युवक दरोड्याच्या प्रयत्नात होते, अशीच माहिती पोलिस खात्याकडून देण्यात आली आहे. सरदार्स ग्राऊंड, सीबीटी, हायवे आदी परिसरात या कारवाया झाल्या.