Thu, Nov 14, 2019 06:19होमपेज › Belgaon › सुप्रीम कोर्टाकडून सभापतींची कानउघडणी; निर्णय घ्या अन्यथा स्थिती 'जैसे थे'

सुप्रीम कोर्टाकडून सभापतींची कानउघडणी; निर्णय घ्या अन्यथा स्थिती 'जैसे थे'

Published On: Jul 12 2019 2:27PM | Last Updated: Jul 12 2019 2:27PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकातील काँग्रेस- निजदच्या १० आमदारांच्या राजीनाम्यावर आणि त्यांच्या अपात्रतेबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले.

तसेच विधानसभा सभापतींना आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. तर याचदिवशी म्हणजे १६ जुलै रोजी राजकीय घडामोडींविषयी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय स्थिती पुढील चार दिवस जैसे थे राहणार आहे.

कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर. रमेश यांनी एकतर आमदारांच्या राजीनाम्यावर अथवा त्यांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यावा. जेणेकरून सुनावणीवेळी कोर्टाला पुढील निर्णय घेता येईल, असे न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत.

काँग्रेस- निजदच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि विधानसभा सभापतींच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार सभापती के. आर. रमेशकुमार यांनी राजीनामे दिलेल्या आमदारांना गुरुवारी प्रत्यक्ष बोलावून सुनावणी केली. त्यांना नाराज आमदारांना त्यांचे राजीनामे स्वीकारल्याचे सांगितले; पण ते मंजूर केले नसल्याचे स्पष्ट केले होते.