Mon, Dec 09, 2019 11:00होमपेज › Belgaon › जुन्या दरानेच बसपास

जुन्या दरानेच बसपास

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 17 2019 2:08AM
बेळगाव : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या बसपास दरवाढीचा आदेश शासनाने मागे घेतला आहे. बुधवारपासून (दि. 19) जुन्या दरानुसारच पास वितरण सुरू करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच पाससाठी ऑनलाईन अर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. ुुु.ज्ञीीींल.ळप या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आवश्यक वैयक्तिक माहिती भरून त्यावर शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांची सही घेऊन शुल्क भरणा करता येणार आहे. ऑनलाईन व्यवस्था नसणार्‍या विद्यार्थ्यांनी गतवर्षीप्रमाणे अर्ज करावा. शाळा, कॉलेजच्या प्रमुखांकडून त्यांना पास वितरित होतील. विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत पासची मुदत वाढवण्यात आली आहे. त्याआधी नवे पास मिळवण्याची सूचना देण्यात आली आहे.

मार्ग परिवहन महामंडळाने पासच्या दरात 100 ते 250 रुपयांपर्यंत  वाढ करण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी जारी केला होता. पण, काही तासांतच तो मागे घेतला आहे. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बसपास दरात 100 रुपये तर महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या बसपास दरात 150 ते 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सेवा शुल्क 200 रु. तर पास नूतनीकरणासाठी 100 रु. भरावे लागणार होते.

महाविद्यालयांना प्रारंभ होऊन महिना लोटला आहे. शाळा सुरु होऊन अर्धा महिना झाला आहे. याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दरवाढीला तीव्र विरोध झाल्याने दरवाढ मागे घेऊन त्वरित बसपास वितरणाचा आदेश जारी केला आहे. 

पासचे दर असे

प्राथमिक शाळा 150 रु., माध्यमिक विद्यार्थी 750 रु., माध्यमिक विद्यार्थिनी 550 रु., पदवीपूर्व, पदवी व डिप्लोमा 1050 रु., व्यावसायिक अभ्यासक्रम 1550 रु.,  सायं कॉलेज, पीएच.डी. 1350 रु, आयटीआय 1310 रु. असे शुल्क आकारण्यात येणार आहे. उनसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारच्या पाससाठी 150 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे. आयटीआय विद्यार्थ्यांना 160 रु. शुल्क आकारले जाईल.