Sat, Dec 14, 2019 06:06होमपेज › Belgaon › विद्यार्थ्यांना सीमावासीय दाखला मिळणे सुरू

विद्यार्थ्यांना सीमावासीय दाखला मिळणे सुरू

Published On: Jun 20 2019 1:54AM | Last Updated: Jun 20 2019 12:04AM
निपाणी : प्रतिनिधी

मराठी भाषिक सीमावासीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सीमावासीय दाखला देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. शिवाय जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे यांनीही सर्वसाधारण सभेत धरणे धरले होते. याला यश येऊन बुधवारपासून तहसीलदार कार्यालयातून दाखला देण्यास सुरुवात झाली. विद्यार्थिनी कु. नीलम उत्तम रक्ताडे हिला निपाणी तहसीलदार कार्यालयात दाखला देण्यात आला. 

माजी आ. काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर, चिकोडी जिल्हा काँगे्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पालकमंत्री ना. सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली होती. 

 

त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मन्नहळ्ळी यांनी तात्काळ संबंधित तहसिलदारांना सीमावासीय दाखला देण्याचे आदेश दिले. तहसीलदार महादेव बनसी यांनी माजी नगराध्यक्ष  व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्या उपस्थितीत बुधवारी विद्यार्थिनीला दाखला  दिला.  सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी  हा दाखला आवश्यक असतो. तो आधी व्यवस्थित मिळत होता. परंतु, अलिकडच्या काळात तो देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. निपाणीत मिळाला तसा तो आता इतरत्रही मिळावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.