Sat, Dec 14, 2019 05:37होमपेज › Belgaon › कडक आचारसंहिता झाली सौम्य; काही अटी झाल्या शिथिल

कडक आचारसंहिता झाली सौम्य; काही अटी झाल्या शिथिल

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 24 2019 11:42PM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेली आचारसंहिता आता थोडी शिथिल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मात्र 27 मेपर्यंत लागू असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर 10 मार्च 2019 पासून बेळगाव जिल्ह्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत जिल्हा प्रशासानकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. बेळगाव जिल्ह्यात कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. या दरम्यान बेकायदा दारु, रोकड, चांदी, वाहने आदी जप्त करण्यात आले होते. विविध पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 

निवडणुकीची आचारसंहिता मतमोजणीनंतर चार दिवस म्हणजे 27 मेपर्यंत लागू असली तरी यातील अनेक अटी आता शिथिल करण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सीमेवर उभारण्यात आलेले 56 तपासणी नाके आता बंद करण्यात आले आहेत. बँकेतून 50 हजाराच्यावर होणार्‍या व्यवहाराचा आता वॉच राहणार नाही. भरारी पथके, व्हिडीओ चित्रीकरण करणार्‍या पथकांचे काम आजपासूनच थांबवण्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात येणार्‍या आचारसंहिता कक्षाचेही काम आता थांबवण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांच्या बातम्यांची कात्रणे निवडणूक आयोगाला पाठवण्याचे कामही थांबवण्यात आले आहे. हे कार्यालय माहिती कार्यालयात 10 मार्चपासून सुरु करण्यात आले होते. 

ही कामे थांबवली...

चेकपोस्ट नाके बंद, वाहनांची तपासणी थांबली
110 भरारी पथकांचे काम थांबले
56 चित्रीकरण करणार्‍या पथकांचे काम बंद
प्रसार माध्यमांचा अहवाल पाठवणे थांबवले
पोलिसांच्या वाहनाला लावण्यात आलेले जीपीएस काढले
बँकांतून होणार्‍या व्यवहारावरील वॉच बंद
महत्त्वाच्या केंद्रांवरुन होणारे 24 तासाचे प्रक्षेपण थांबवले