Mon, Jul 06, 2020 04:02होमपेज › Belgaon › चौथ्या दिवशीही अथणी-कागवाड मार्गावर रास्ता रोको

चौथ्या दिवशीही अथणी-कागवाड मार्गावर रास्ता रोको

Published On: Nov 21 2018 1:07AM | Last Updated: Nov 20 2018 8:52PMसंबरगी : प्रतिनिधी

गेल्या वर्षाचे बिल जमा करावे यासाठी अथणी-कागवाड राज्यमार्गावर मुरगुंडीजवळ चौथ्या दिवशीही शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ऊस दरासाठी अथणी तालुक्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. कागवाड मतदारसंघात गावे बंद ठेऊन अनेक गावात आंदोलन सुरू झाले असून साखर कारखाना शेतकरी संघटना यांच्यात खडाजंगीस सुरुवात झाली आहे. रस्त्यावर चुली मांडून आंदोलन सुरू आहे.

गेले 15 दिवस आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन बिल घालण्याचा आदेश कारखान्यांना देण्यात आला परंतु त्यांच्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे 16 नोव्हेंबरपासून रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली आहे. आता आंदोलन वेगळेच वळण घेत आहे. काही कारखाने गुंडांना आणून हैदोस घालत आहेत तर काही ठिकाणी दगडफेक करून वातावरण तंग करीत आहेत.शेतकरी संघटना आणि कारखाना यांच्या संघर्षात सामान्य शेतकरी मात्र कात्रीत सापडला आहे.

कोकटनूर, ऐगळी, ऐनापूर, कागवाडसह अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आंदोलन करून कारखान्याच्या अन्यायी धोरणांचा निषेध करीत आहेत. बिल घेतल्याशिवाय जागा सोडणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.
यावेळी माजी आ. भाजप नेते लक्ष्मण सवदी यांनी मुरगुंडी येथे आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त करून ते म्हणाले, राज्य शासनाने साखर कारखान्यांची गोदामे सील करून रयतांची बाकी बिल द्यावे तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी महिलांविषयी बोललेले शब्द मागे घेऊन जाहीर माफी मागावी. या आंदोलनास गच्चीनमठाचे शिवबसव स्वामीजींनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळी विनोक बागडी, रयत संघाचे महादेव मडवाळ, राजू पुजारी, रवि पुजारी, अण्णासाहेब तेलसंग आदी उपस्थित होते.