Thu, Dec 05, 2019 21:05होमपेज › Belgaon › मंदिरांतून 3 लाखांचे दागिने लंपास

मंदिरांतून 3 लाखांचे दागिने लंपास

Published On: Nov 21 2018 1:07AM | Last Updated: Nov 21 2018 1:07AMकडोली / केदनूर : वार्ताहर

मंदिरे फोडणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, सोमवारी मध्यरात्रीनंतर कडोलीमधील एक आणि केदनूरमधील तीन अशी एकूण चार मंदिरे चोरट्यांनी फोडली. चारही मंदिरांमधील मूर्तींच्या अंगावरील सुमारे तीन  लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविण्यात आले आहेत. 

पंधरवड्यापूर्वी याच भागातील अगसगा गावातील मंदिर फोडण्यात आले होते. तो तपास अपूर्ण असताना सोमवारी मध्यरात्री आणखी चार मंदिरे लक्ष्य बनली. कडोलीतील पेठ गल्लीत असलेल्या रेणुका मंदिराचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी प्रवेश मिळवला. मूर्तीवरील नथ, मंगळसूत्र, असे सुमारे 50 हजारांचे दागिने लुटून त्यांनी पुन्हा कुलूप लावून पलायन केले. मंगळवारी सकाळी मंदिराच्या महिला पुजारी मरवे मंदिरात पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांपूर्वीही या मंदिरात चोरी झाली होती. केदनुरात तीन तालुक्यातील केदनुरात सोमवारी रात्रीच तीन मंदिरांचे कुलूप तोडून तिन्ही मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने असे सुमारे अडीच लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. भरवस्तीत असणार्‍या श्री महालक्ष्मी मंदिरात गाभार्‍याचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, दोन मणी, दहा ग्रॅम वजनाचा हार, सोन्याची नथ व चांदीचे दागिने चोरले. मंदिर भरवस्तीत असूनही चोरीचा थांगपत्ता लागला नाही. 

श्री लक्ष्मीदेवी (काटनट्टी लक्ष्मी) व श्री हालव्वा देवी मंदिरांचेही कुलूप तोडून चोरट्यांनी लक्ष्मीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची नथ असे चाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने लुटले. तसेच  हालव्वादेवी मंदिरातील चांदीच्या चार मूर्ती व इतर ऐवज असा सुमारे पन्नास तोळे चांदीचे दागिने लंपास केले. मंगळवार असल्याने सकाळी सुमारे सात वाजताच पूजेसाठी गेलेल्या भक्तांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुजारी बाळकृष्ण सुतार व आनंद लोहार यांनी तक्रार दाखल केली आहे.