Thu, Dec 05, 2019 21:15होमपेज › Belgaon › धूळवाफ भात पेरणीला प्रारंभ

धूळवाफ भात पेरणीला प्रारंभ

Published On: May 22 2019 1:36AM | Last Updated: May 21 2019 11:07PM
बेळगाव : प्रतिनिधी

पाऊस  अद्याप गायब असला तरी धूळवाफ भात पेरणीला प्रारंभ झाला आहे. वडगाव परिसरातील शेतकर्‍यांनी नेेहमीच्या प्रथेप्रमाणे मंगळवारी पेरणीला प्रारंभ केला. येत्या काळात भात पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.

बेळगाव शहराच्या उपनगरात आणि तालुक्यात धूळवाफ पेरणीला प्राधान्य देण्यात येते. 21 मे रोजी अनेक भागात पारंपारिकरित्या पेरणी करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी पेरणीला सुरुवात झाली. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना येणार्‍या पावसावर भरवसा ठेवून बळीराजाकडे पेरणी हंगामाला सुुरुवात करण्यात आली आहे.

बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील बहुतांश भागात मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात पेरणी हंगाम सुरू होतो. तापलेल्या मातीत पेरणी करण्यात येते. यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते, असा समज शेतकर्‍यांचा आहे. खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. मृग नक्षत्रानंतर पावसाची संततधार सुरू होते. यामुळे धूळवाफ पेरणीला प्राधान्य देण्यात येते.

येत्या काळात पेरणीला वेग येणार आहे. शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. नांगरणी, कुळवणी कामे जोमात सुरू आहेत. बैलजोडींची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. 

बैलजोडीला हजार रु. मजुरी

मशागत आणि पेरणीच्या कामासाठी बैलजोडींना मागणी वाढली आहे. एका दिवसाठी बैलजोडीला एक हजार रुपये आकारण्यात येत आहे. तर ट्रॅक्टरला तासाला भाडे आकारण्यात येते. महागाईमुळे मजुरीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मशागतीच्या कामाला मजुरांची टंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात अद्याप लग्नकार्ये, यात्रा सुरू असल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. 

हवामानात बदल

शहर परिसरात मंगळवारी सकाळपासून हवामानात बदल आढळून आला. सकाळच्या सत्रात हवामान ढगाळ होते. दुपारच्या सत्रात उन्हाचा तडाखा होता. आठवडाभरापासून तापमानात चढत्या श्रेणीत वाढ झाली होती. मंगळवारी यामध्ये किंचित घट होवून आभाळात बदल झाल्याचे दिसून आले.