Mon, Dec 09, 2019 11:01होमपेज › Belgaon › कसोटीसाठी श्रीलंका ‘अ’ संघ बेळगावात दाखल

कसोटीसाठी श्रीलंका ‘अ’ संघ बेळगावात दाखल

Published On: May 22 2019 1:35AM | Last Updated: May 22 2019 1:42AM
बेळगाव : प्रतिनिधी

ऑटोनगर, कणबर्गी येथील मैदानावर चार दिवसीय कसोटी सामना खेळण्यासाठी श्रीलंकेचा अ संघ मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी बेळगावात दाखल झाला. भारतीय अ संघ बुधवारी दाखल होणार आहे. 25 मे पासून कसोटी सुरू होणार असून यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

भारत अ आणि श्रीलंका अ संघांत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने रंगणार आहेत. 25 मे रोजी पहिला कसोटी सामना होणार असून त्यासाठी दोन्ही देशांनी आपापले संघ जाहीर केले आहे. त्यानुसार आज सायंकाळी साडेपाच वाजता बंगळूर येथून श्रीलंका संघ बेळगावात दाखल झाला. या संघात अशान प्रियंजन (कर्णधार), भानुका राजपाक्षा, पथुम निसंका, प्रियमल परेरा, संगीत कुरे, निरोशन डिकवेला, सदिरा समरविक्रम, लाहिरू कुमारा, दुष्मंत चामीरा, विश्‍वा फर्नांडो, चामीरा कुरूणारत्ने, लक्ष्मण सदाकन, अकीला धनंजय, कामिंदू मेंडिस यांचा समावेश आहे. हा संघ 23 मे रोजी ऑटोनगर येथील मैदानात सराव करणार आहे.

भारतीय संघ बुधवारी दाखल होणार आहे. दोन पथकांत हा संघ दाखल होणार असून दुपारी 4 वाजता आणि सायंकाळी 5.30 वाजता संघ बेळगावात येणार आहे. मुंबईहून हा संघ बेळगावात येणार आहे.

या सामन्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या पथकाने पाहणी केली असून पोलिस अधिकार्‍यांनीही पाहणी केली आहे. दोन्ही संघ राहण्याची ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे.

जल्लोषी स्वागत 

पहिल्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंका अ संघ बंगळूरहून सायंकाळी बेळगाव येथील सांबरा विमानतळावर दाखल झाला. यावेळी केएससीए च्या वतीने धारवाड विभागाच्या पदाधिकार्‍यांनी संघाचे भारतीय पध्दतीने हार घालून  स्वागत केले.