होमपेज › Belgaon › ‘खुनी’ पोलिसांची गय नाही : जी. परमेश्‍वर

‘खुनी’ पोलिसांची गय नाही : जी. परमेश्‍वर

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:08AMबंगळूर : प्रतिनिधी

विजापूर जिल्ह्यातील काही पोलिस अधिकार्‍यांनी एका गुंड टोळीच्या मदतीला जाऊन एका इसमाचा खून केला आहे. त्यामध्ये सहभागी असलेल्या पोलिस अधिकार्‍यांची सरकार कोणतीही गय करणार नाही, असे उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनी स्पष्ट केले.

चडचण बंधूंच्या हत्येत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ हळ्ळूरसह एका सीपीआयचा सहभाग असल्याचे सीआयडीचे म्हणणे आहे. हळ्ळूर अटकेत असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता उपमुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. उच्चस्तरीय आयपीएस अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर ते  पत्रकारांशी बोलत होते. 

कर्नाटकाचा गुन्ह्यामध्ये देशामध्ये दहावा क्रमांक लागतो. त्यासाठी पोलिस अधिकार्‍यांनी राज्यातील गुन्हे कमी करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

कोणत्याही समाजाने मर्यादा ओलांडून गोंधळ किंवा हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिला. श्रीरामसेना किंवा मुस्लिम संघटनांवर बंदी घालणार आहात का? या प्रश्‍नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले, बेकायदेशीर कृत्ये किंवा समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू किंवा मुस्लिम असा भेद न करता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.  

उपमुख्यमंत्री डॉ. परमेश्‍वर म्हणाले, तशा संघटनांवर सरकारने आपले बारीक लक्ष ठेवले असून त्या संघटनांनी कोणतीही आगळीक केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिस अधिकार्‍यांनी समाजात जातीय सलोखा धोक्यात आणणार्‍या घटकाविरुद्ध कठोर कारवाई करावी. 

आपल्या सरकारने पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणाचा यशस्वी तपास करून आरोपींना अटक केली आहे. पोलिस अधिकार्‍यांनी खुनाचे हे प्रकरण व्यवस्थितरीत्या हाताळून त्यामधील आरोपींचा छडा लावला आहे.